कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळात विविध कृती कार्यक्रम हाती घेऊन समाज सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकीच एक म्हणजे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेले ‘सत्यसुधारक हॉटेल’. ज्या काळात रूढी, परंपरा, जातपात पाळल्या जात त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी महार समाजातील व्यक्तीला हॉटेल सुरू करून द्यायचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
खरं तरं १९१९ ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.
पुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर ‘सत्यसुधारक’ हॉटेल सुरू केलं.
शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी यानिमित्ताने समाजातील जातीपातीला मूठमाती मिळावी यासाठी यानिमित्ताने प्रयत्न केले. शाहू महाराजांची सही कुणाला हवी असेल तर गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलमध्येच या म्हणून सांगितले जात असे. यामुळे गंगाराम यांच्या हॉटेलवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली. यावेळी शाहू महाराज येणाऱ्या प्रत्येकाला गंगाराम कांबळे यांच्या हातचा चहा पाजून मगच सही करत.
शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. हेच गंगाराम कांबळे पुढे अस्पृश्य समाजाचे पुढारी बनले. अस्पृश्योध्दाराच्या काळात महाराजांचे ते कार्यकर्ते झाले. शाहू महाराजांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्य मुक्तीच्या लढ्यात कोल्हापूर संस्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठवान कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले.
संदर्भ – श्री. शाहू महाराज यांच्या आठवणी ,लेखक- माधवराव बागल १९५०
——————————————————————————————



