मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी संपत असून, नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात त्यांच्या कार्यकाळाचा निरोप समारंभ पार पडला. त्यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे संख्याबळ ७ वरून ६ वर येणार आहे. यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत चढाओढ सुरु झाली आहे.
सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ, तर ठाकरे गटाचे सात सदस्य आहेत. अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ कमी होणार असल्याने काँग्रेसने संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. काँग्रेसने यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काही अपक्ष सदस्यांचा पाठिंबा मिळविल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून आक्रमक शैली, राजकीय वजन आणि आर्थिक ताकद असणाऱ्या चेहऱ्याच्या शोधाला वेग आला आहे. यामध्ये सतेज पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ते सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते आहेत आणि त्यांना दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव यांचे नाव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले आहे. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला असून, याच्या मोबदल्यात ठाकरे गटानेही विधान परिषदेत काँग्रेसच्या दाव्याला पाठिंबा द्यावा, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. काँग्रेसकडून असा दावा करण्यात येतो आहे की, विधानसभेतील पाठिंब्याच्या बदल्यात विधान परिषदेत ठाकरेंकडून पाठिंबा मिळणारच.
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच या पदावर कोणाची वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे. सध्या काँग्रेसने जोरदार दावा करत सतेज पाटील यांचे नाव पुढे केले असून, ठाकरे गटाकडून सहमती मिळाली, तर सतेज पाटील यांच्याकडे ‘लाल दिवा’ जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
नजीकच्या काळात विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय होण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीतील सामंजस्य, संख्याबळाचे गणित आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका यावरच या पदाचे भविष्य ठरणार आहे..
————————————————————————————–