कोल्हापूर डेस्क : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी साहित्य विश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक असा समजला जाणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ९९ वा सोहळा यावर्षी सातारा शहरात आयोजित होणार आहे. तब्बल ३२ वर्षांनतर सातारा जिल्ह्याला हा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.
सातारा हे केवळ ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर साहित्य आणि कला यांचे माहेरघर म्हणून सुद्धा ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेले हे शहर मराठी साहित्य संमेलनासाठी योग्य ठिकाण आहे. १९९३ साली म्हणजेच सुमारे ३२ वर्षापूर्वी साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन भरवले गेले होते. योगायोग म्हणजे १९९३ साली ज्या शाहू स्टेडीयमवर हे संमेलन भरवलं गेलं होतं त्याच स्टेडीयमवर ९९ वे साहित्य संमेलन भरवले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.
साहित्य संमेलन स्थळ निवडीची प्रक्रिया :
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवडण्याचे काम अत्यंत पारदर्शक आणि काटेकोरपणे पार पडले. यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने विशेष स्थळ निवड समिती गठीत केली होती. यामध्ये सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषदेची इचलकरंजी शाखा, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर), आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा (सातारा) यांचा समावेश होता. या सर्व संस्थांनी संमेलन आयोजनासाठी उत्साहाने निमंत्रणे दिली होती. ८ जून रोजी पुण्यात झालेल्या समितीच्या बैठकीत साताऱ्याच्या शाहूपुरी शाखेची निवड करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनातील संभाव्य मुद्दे:
नव्या पिढीतील साहित्यिकांचा सहभाग
डिजिटल साहित्यलेखनाचा वाढता प्रभाव
ग्रामीण-शहरी साहित्याचा समन्वय



