पुणे : विशेष प्रतिनिधी
आज शनिवार, दिनांक २१ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एक विशेष धार्मिक सोहळा पार पडला. पहाटेच्या पवित्र वेळी काशी विद्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांच्या शुभहस्ते पवित्र पादुकांचे विधिवत पूजन व महाअभिषेक संपन्न झाला. या अनुषंगाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
महाअभिषेकाच्या वेळी आचार्यांनी वैदिक मंत्रोच्चार करीत मंगलमय वातावरण निर्माण केले. विविध पवित्र घटकांनी ( दूध, दही, मध, तूप, फळरस, गंगाजल ) महाराजांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. यावेळी शेकडो वारकरी भक्त, संत मंडळी व स्थानिक भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची गाथा, भजन, अभंग यांच्या गजरात संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने या पावन प्रसंगी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थानच्या प्रमुखांनी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविले. त्यांचे अध्यात्मिक योगदान व संस्कृती संवर्धनातील कार्य गौरवास्पद असल्याचे या वेळी संस्थानच्या वतीने नमूद करण्यात आले.
या पावन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले भाविक आणि वारकरी यांनी हरड महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पालखी सोहळ्याचे हे धार्मिक पर्व भाविकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारे ठरले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढील टप्यांमध्येही अशाच भक्तिभावपूर्ण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
——————————————————————————