प्रसारमाध्यम डेस्क
यावर्षी ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ या पुरस्कार देशातील १७ खासदारानां जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राने बाजी मारली १७ पैकी ७ खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. ‘संसदरत्न’ पुरस्कार ही संकल्पना नेमकी काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सन २०१० मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसदेमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना ओळख मिळावी म्हणून ‘संसदरत्न’ पुरस्काराची संकल्पना मांडली. त्यांच्या प्रेरणेने हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. लोकशाही मजबूत व्हावी, खासदारांनी संसदेत प्रभावी कामगिरी करावी आणि जनतेला त्यांच्या खासदारांच्या कामाची पारदर्शक माहिती मिळावी या विधायक उद्देशाने ‘संसदरत्न’ पुरस्काराची संकल्पना सुरू करण्यात आली. निवृत्त पत्रकार जी.ए. संपत कुमार यांच्या ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत खासदारांच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेऊन आणि त्यांच्या कामाचे मूल्यांकन करून हा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर केला जातो. हे मूल्यांकन लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत आकडेवारीवर आधारित असते.
‘संसदरत्न’ पुरस्कार खासदारांना त्यांच्या संसदेमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो. यासाठी खालील प्रमुख गोष्टींचा विचार केला जातो:
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या
खासगी सदस्य विधेयक सादर केलेली संख्या
लोकसभेतील चर्चांमध्ये सहभाग
समित्यांमधील सक्रिय सहभाग
एकूण संसदीय सहभाग व उपस्थिती
पात्रता:
केवळ सध्याचे लोकसभा खासदार (प्रसंगी माजी खासदारांनाही सन्मानार्थ देतात).
सामान्यतः स्वतंत्र आणि पक्षश्रेष्ठींपासून प्रभावित न होणारे मूल्यांकन यावर भर दिला जातो.
प्रमुख विभाग (श्रेणी):
सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरी
उत्कृष्ट प्रश्न विचारणारे खासदार
उत्कृष्ट विधेयक मांडणारे खासदार
समित्यांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे खासदार
राज्यनिहाय किंवा विभागनिहाय सन्मान
वरील प्रमाणे ‘संसदरत्न’ पुरस्कार देण्याची प्रक्रिया असते. आपल्या मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी खासदारानां प्रेरणा मिळावी आणि लोकशाही बळकट व्हावी, या उद्देशाने खासदारानां ‘संसदरत्न’ पुरस्कार देण्याची परंपरा सुरू झाली आहे.
सर्वाधिक वेळा मिळवणारे खासदार म्हणजे हंसराज गंगाराम अहीर आहेत. त्यांनी २०१०, २०११, २०१२, २०१३ आणि २०१४ या सलग पाच वर्षांमध्ये हे पुरस्कार मिळवले आहेत . त्यांच्या संसदीय कामगिरीमध्ये त्यांनी १५ व्या लोकसभेत २४ खासगी विधेयके सादर केली होती, जी त्या काळात सर्वाधिक होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवण्याचा मान हा सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना जातो. यांनी २०१५ ते २०१९ या सलग पाच वर्षांमध्ये संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला आहे. यावर्षीचा म्हणजेच २०२५ चा सुद्धा ‘संसदरत्न’ पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. २०२० मध्ये ‘संसद महारत्न’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले, आहे. हा पुरस्कार पाच वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
कॉँग्रेसचे माजी खासदार कै. राजीव सातव यांनी सलग चार वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला आहे. १६ व्या लोकसभेत त्यांनी २०५ चर्चांमध्ये सहभाग घेतला, १,०७५ प्रश्न विचारले आणि २३ खासगी विधेयके सादर केली होती.
२०२५ चा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले महाराष्ट्रातील खासदार :
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट)
श्रीरंग बारणे ( शिवसेना शिंदे गट)
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
स्मिता वाघ (भाजप)
मेधा कुलकर्णी (भाजप)
वर्षा गायकवाड (कॉँग्रेस)
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)






