प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
यंदाच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेडला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले असून, युरोपियन संघटनेचे दोन प्रमुख नेते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा (Antonio Costa) आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन (Ursula von der Leyen) यांच्या उपस्थितीत यंदाचा राष्ट्रीय सोहळा अधिक भव्य ठरणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून होईल. यावेळी ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षांचा गौरव साजरा केला जाईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता कर्तव्य पथावर मुख्य परेड सुरू होईल. ही परेड साधारण दीड ते दोन तास चालणार आहे.
30 चित्ररथांमधून भारताचा वैभवशाली प्रवास
यंदा कर्तव्य पथावर एकूण 30 भव्य चित्ररथ सादर होणार आहेत. प्रत्येक चित्ररथाचा विषय “स्वातंत्र्याचा मंत्र : वंदे मातरम्” आणि “समृद्धीचा मंत्र : आत्मनिर्भर भारत” असा असून, भारताचा इतिहास ते आधुनिक प्रगतीपर्यंतचा प्रवास यामधून उलगडणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ थीम विशेष आकर्षण
यंदाच्या परेडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवर आधारित चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहे. या चित्ररथातून भारतीय सैन्याचे सामर्थ्य, तसेच राफेल आणि अन्य लढाऊ विमानांचे प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे. विविध राज्यांचे चित्ररथ त्यांच्या सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती, पर्यटन आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवतील.
सैन्य शक्तीचे भव्य प्रदर्शन
भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना आपल्या सर्वोत्तम क्षमतेसह परेडमध्ये सहभागी होतील. विशेषतः वायुसेनेचा ‘सिंदूर’ फॉर्मेशन फ्लायपास्ट हे आकर्षण ठरणार असून, यामध्ये राफेल, सुखोई-30 आणि मिग-29 सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आकाशात झेपावतील.
2,500 कलाकारांची सांस्कृतिक मेजवानी
पॅरेडमध्ये सुमारे 2,500 कलाकार सहभागी होणार असून, ते पारंपरिक नृत्य, संगीत आणि विविध लोककला सादर करतील. चित्ररथांसोबत देशातील समृद्ध व विविध संस्कृतीचे दर्शन एकाच रांगेतून जगासमोर मांडले जाईल.
कडक सुरक्षा व्यवस्था
या राष्ट्रीय सोहळ्यासाठी कर्तव्य पथावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकत्रित देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.





