मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सरकारने रेशन दुकान धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली असून, प्रति मेट्रिक टनामागे २० रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे याआधी मिळणारे १५० रुपये आता १७० रुपये मिळणार आहेत.
वेळेवर कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदारांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वेळोवेळी पुरवठा विभागाकडे मार्जिन वाढवण्याची मागणी केली जात होती. अखेर फडणवीस सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वाढीची घोषणा केली आहे.
रेशनिंग दुकानदारांचे मार्जिन कसे काम करते ?
-
कमिशन स्वरूप : रेशन दुकानदारांना धान्य ( उदा. गहू, तांदूळ ) आणि इतर वस्तू ( उदा. साखर, रॉकेल) विकल्याबद्दल प्रति क्विंटल किंवा प्रति लिटर प्रमाणे कमिशन दिले जाते.
-
निश्चित दर : हे दर राज्य सरकारकडून ठरवले जातात आणि वेळोवेळी त्यात वाढ केली जाते.
-
उत्पन्नाचा मुख्य स्रोत : हेच मार्जिन रेशन दुकानदारांचे प्रमुख उत्पन्न असते. यातून दुकानाचे भाडे, वीज बिल, कर्मचारी पगार आणि इतर खर्च भागवले जातात.
-
इतर कामांचा मोबदला : धान्य वाटपा व्यतिरिक्त, दुकानदारांना शासकीय कामे जसे की नवे रेशन कार्ड तयार करणे, आधार लिंक करणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे, स्थलांतरितांची नोंद ठेवणे यासाठीही याच मार्जिनचा मोबदला मिळतो.



