राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसाला राधानगरी तालुक्यात आज थोडी उसंत मिळाली आहे. या उघडीपामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामांना गती दिली आहे. पावसामुळे पेरणीची कामं खोळंबली होती त्या कामांनी आता वेग घेतला आहे.
तालुक्यातील गावागावांत शेतीची तयारी, नांगरणी, गवत कापणी तसेच खतांचा पुरवठा आणि बी-बियाणांची खरेदी यास सुरुवात झाली आहे. विशेषतः भात लागवडीसाठी योग्य हवामानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही संधी साधत आपल्या शेतामध्ये कामांना सुरूवात केली आहे.
सदर हवामानाचा फायदा घेत अनेक शेतकरी आपल्या बैलजोड्या आणि यंत्रसामग्रीसह शेतात उतरले आहेत. काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असल्या तरीही बहुतेक शेतकऱ्यांनी शेतीच्या प्राथमिक कामांना गती दिली आहे.
दरम्यान, तालुक्याच्या काही भागांत पुन्हा ढगाळ वातावरण असून, आगामी दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेऊन कामे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.