भोगावती : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी भोगावती येथे त्यांच्या गटाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व संचालक, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा देत राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांनी या निर्णयाआधी सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सांगितले, “जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा आम्ही सहजपणे निवडून आणू शकतो.” त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
बैठकीस काँग्रेस पक्षाचे संचालक धीरज डोंगळे ( घोटवडे ), आनंदराव चौगले, कृष्णराव पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गटबांधणी, आगामी निवडणुका आणि पक्षवाढीच्या दृष्टीने पुढील रणनितीवरही चर्चा झाली. दरम्यान, बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले व साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील अनुपस्थित होते.
या सामूहिक निर्णयामुळे भोगावती साखर कारखाना क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरित्या वाढणार असून, अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गट सक्रिय होण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी काळात औपचारिक प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
———————————————————————————