कृष्णात चौगले : कोल्हापूर
हिरवीगार वनराई, छोटे-मोठे धबधबे, खोल दऱ्या, मुसळधार पाऊस, कड्याकपारीतून वाहणारा धुंद वारा अशा बेधुंद वातावरणात दूध – आमटीचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जैवसंपत्तीने नटलेल्या राधानगरी तालुक्याला पसंती दिली जात आहे. एकाच तालुक्यात तीन धरणांच्या भेटीचा बेत मनाला सुखद अनुभव देणारा ठरेल यात शंका नाही.
निसर्गसौंदर्यांची खाण म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यात विविध जैवसंपत्तीचा खजिना आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे दाजीपूर गवा अभयारण्यात याच तालुक्यात आहे. राधानगरीच्या पश्चिमेस ३७,१८८ चौरस किलोमीटर विखुरलेले हे जंगल अनेक प्रजातींचे अधिवास आहे. गवा, वाघ, सांबर, रानडुक्कर, भेकर, बिबटे अशा वन्यप्राण्यांचे दर्शन हे नित्यनेमाचे आहे. विविध प्रकारची फुलपाखरे, अनेक प्रजातींची फुले, दुर्मीळ व औषधी वनस्पतींची रेलचेल या ठिकाणी आहे. देवरायांची भुरळ ही निसर्ग पर्यटनाला साद घालते.
राहणे-जेवणाची उत्तम सोय
राधानगरी हे तालुक्याचे व बाजाराचे मुख्य ठिकाण असल्याने इथे राहण्यासाठी शासकीय विश्रामगृह व खासगी हॉटेल उपलब्ध आहेत. कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा, चुलीवरचे मटण, भाकरी, शाकाहारी व मांसाहारी पदार्थ येथे मिळत असून वेगळी ओळख असलेली दूध आमटी खास आकर्षण आहे.
काय पाहता येईल – राधानगरी लक्ष्मी तलाव, स्वयंचलित दरवाजे, राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक, काळम्मावाडी व तुलशी धरण, राऊतवाडी धबधबा, गैबी व करंजफेण घाट, गैबीजवळ असणारी गव्याची प्रतिकृती, दाजीपूर अभयारण्य, तीर्थक्षेत्र दुर्गमानवाडचे विठ्ठलाई मंदिर, गगनगिरी मठ, चक्रेश्वरवाडी येथील पुरातन मंदिर, प्राचीन गुहा, शिखर, तालुक्यातील हिरवीगार शेती.
कसे जाता येईल ?
-
कोल्हापूर पासून ६० किलोमीटर वर राधानगरी असून, कोल्हापूर मध्यवर्ती बसथानक व रंकाळा बसस्थानकावरून दर तासाला एसटी बसची सोय आहे.
-
निपाणी मार्गेही जाता येते – मुरगूड -मुदाळतिट्टा – सरवडे – राधानगरी.
-
राधानगरीतून दाजीपूर अभयारण्य २६ किलोमीटरवर आहे तर राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण इथून जवळच्या अंतरावर आहे.
—————————————————————————————————–