कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडील परवानगी घेतलेल्या अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
वरील बाबीची पूर्तता करणा-या, करु शकणा-या सार्वजनिक गणेशोत्सव पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळवर उपक्रम या टॅबवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सहभागी गणेशोत्सव मंडळानी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन – २०२४ च्या अनंत चतुदर्शी ते सन – २०२५ च्या गणेश चतुदर्शी पर्यंतचा असेल.
स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरुन राज्यस्तरावर निवड होणा-या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रू. २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.
सन २०२५ मध्ये राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक ५ लाख रूपये, व्दितीय क्रमांक २.५० लाख रूपये, तृतीय क्रमांक १ लाख रूपये असे आहे.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या समन्वयाखाली स्थापन करण्यात आलेली निवड समिती ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात भेट देईल. समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओग्राफी भेटीवेळी सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांनी केले आहे.
———————————————————————————————-