कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. तर प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये पोलीस प्रशासनातील विविध विभागांचा आढावा श्रीमती तटकरे व डॉ. भोयर यांनी संयुक्तरित्या घेतला.
श्रीमती तटकरे म्हणाल्या, पिडीत महिलांसाठी असणाऱ्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे तसेच या योजनेची वयोमर्यादा कमी केली आहे. भरोसा सेल, निर्भया, दामिनी पथकाच्या अधिक सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून (डीपीडीसी) निधीची मागणी करावी. जिल्ह्यात वन स्टॉप सेंटरची संख्या वाढवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव द्यावेत. सायबर क्राईमला रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत अधिक प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करुन मनोधैर्य योजनेची काही प्रकरणे प्रलंबित आहेत का ? अशी विचारणा केली.
डॉ. भोयर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात पोलीसांसाठी ठिकठिकाणी गृहसंकुले उभारण्यात येत आहेत. मानवी वाहतूक अनैतिक प्रतिबंध ( ह्युमन ट्रॅफीकींग ) बाबत चिंतन व्हावे तसेच याचे प्रमाण कमी कसे होईल याबात पोलीस विभागाने दक्ष रहावे.
राज्य शासनाने ‘लाडकी बहिण’ या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे. मात्र महिलांची आर्थिक प्रश्नापेक्षा सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. ही सुरक्षा सांभाळण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. महिला पोलीसांनी विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच महिलांसोबत अधिक संवाद वाढवावा, अशी सूचना करुन भरोसा सेलचे कामकाज चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तत्पूर्वी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती यादव यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहरात पोलीसांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलाबाबत, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, महिला अत्याचार गुन्हे माहिती तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेली निर्भया पथके, भरोसा सेल, महिला कक्ष, आदीबाबतचे पी.पी.टी.व्दारे सारदीकरण केले.
उपस्थिती- अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) अण्णासाहेब जाधव, शहर (डीवायएसपी) श्रीमती प्रिया पाटील, गृह (डीवायएसपी) श्रीमती सुवर्णा पत्की उपस्थित होते.
——————————————————————————
Be the first to write a review