कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना केवळ दोनच भाषा शिकवण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. मात्र आता राज्य शासनाने नव्याने एक निर्णय घेतला असून, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्याच लागणार आहेत. विशेष म्हणजे या तीन भाषांमध्ये हिंदीचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक मोठी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दोनच भाषा शिकायला मिळतील, असे सांगितले होते. पहिलीपासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवणार, असे त्यांनी ठरवले होते. या निर्णयाला खूप विरोध झाला. त्यामुळे दादा भुसे यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला. पण त्यांनी याबाबत कोणताही लेखी निर्णय दिला नव्हता. त्यानंतर, यावर्षी पहिलीपासून तिसरी भाषा नसेल, असे भुसे यांनी जाहीर केले. पण त्याचेही लेखी आदेश आले नव्हते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे मंगळवारी रात्री उशिरा एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला. या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य आहे. त्यामध्ये हिंदी हा एक पर्याय असेल.
या नव्या निर्णयानुसार, जर एखाद्या वर्गात २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दुसरी भाषा निवडली, तरच त्यांना हिंदी ऐवजी दुसरी भाषा शिकण्याची मुभा मिळेल. अन्यथा सर्व विद्यार्थ्यांना हिंदी शिकावी लागेल. या बदलामुळे शिक्षणमंत्र्यांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. ‘दोन भाषा’ धोरणाचा उल्लेख करून जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
पालक आणि शिक्षक वर्गात या निर्णयाबाबत संभ्रम व चिंता निर्माण झाली असून, राज्य सरकारने लवकरच या विषयावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.