कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
किल्ले विशाळगड हा राज्यसंरक्षित स्मारक असून सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता संचालक, राज्य पुरातत्व विभाग यांनी किल्ल्यावरील उरूसास ०६ जून च्या आदेशाने परवानगी नाकारली आहे.
किल्ले विशाळगडावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणताही सण अथवा उत्सव साजरा होणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीसह मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गडावर कोणताही सण वा उत्सव साजरा होऊ देणार नाही, असा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख गुप्ता यांनी प्रत्यक्ष विशाळगडाला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या वतीने ही माहिती दिली. गुरुवारी जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक पार पडली असून, त्यात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विशाळगडावर शांतता राखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी दिलेल्या लेखी सूचनांचे अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाकडून सदर कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली असून दर्ग्याचे विश्वस्त यांना कळवण्यात आलेले आहे. सदर सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच शाहूवाडीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचा विशाळगड किल्ल्याचे परिसरामध्ये दि ०१ जून २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत बंदी आदेश लागू असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये नागरिकांना विशाळगड किल्ल्यावर जाता येईल.
बाहेरील नागरिकांना किल्ल्यावर पाच नंतर थांबता येणार नाही. कार्यपद्धतीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे बंधन कारक आहे.
—————————————————————————————–



