मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लखपती दीदी या महत्वाकांक्षी उपक्रमात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. राज्यातील तब्बल २५ लाख बहिणी लखपती दीदी झाल्या असून आणखी २५ लाख होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रातील १ कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत दादरच्या योगी सभागृहात भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित राखी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्षा आ. चित्रा वाघ, मंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “लखपती दीदी म्हणजे फक्त लाख रुपये मिळवणारी महिला नाही, तर दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न स्वतःच्या कष्टावर मिळवणारी महिला. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून विविध योजना सुरू आहेत. निवडणुकीनंतर या योजना बंद होतील, असे अनेकजण म्हणत होते; मात्र गेल्या पाच वर्षांत एकही योजना बंद होऊ दिली नाही आणि पुढेही पाच वर्षांत असं होऊ देणार नाही. पुढील काळात तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं तर याही पुढे या योजना सुरू राहतील.”
राखीच्या निमित्ताने बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ राखीला जात, धर्म, प्रांत, भाषा नसते. राखी ही निरपेक्ष प्रेमाची निशाणी आहे. आम्ही परिवार आणि कुटुंब मानणारे आहोत. ज्यांच्या पाठीशी लाखो बहिणींचं प्रेम आहे, त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही. कोणत्याही शस्त्र-अस्त्रापेक्षा बहिणींचे आशीर्वाद ताकदवान असतात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला केंद्रीत विकास मॉडेलचे कौतुक करत फडणवीस म्हणाले, “बेटी बचाओ, बेटी पढाओ पासून ते लखपती दीदीपर्यंतचा प्रवास मोदींनी घडवला. महिला घरात बसणाऱ्या नाहीत, त्या देशाच्या विकासात थेट सहभागी होत आहेत. जगातील अमेरिका, युरोप, जपान, कोरिया या देशांनी महिलांना मानव संसाधनात बदललं तेव्हाच ते विकसित अर्थव्यवस्था झाले. त्याच दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली असून पुढच्या २० वर्षांत भारत जगातील पहिली किंवा दुसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. यात भगिनींची भागीदारी महत्त्वाची असणार आहे.”
फडणवीस यांनी महिलांच्या कल्पकतेचाही विशेष उल्लेख केला. “ नागपुरात काही भगिनींनी फक्त १५०० रुपयांत फायनान्स सोसायटी सुरू केली. त्यातून महिलांना कर्ज देऊन पायावर उभं करण्यात आलं. हेच मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहोत. महिलांना दिलेलं कर्ज १०० टक्के परत येतं, एकही पैसा बुडत नाही. महिलांच्या प्रामाणिकपणामुळे आणि कष्टामुळे हा विश्वास सरकारला आहे,” असे ते म्हणाले.
————————————————————————————————————————