The state-of-the-art system 'Trinetra', developed by the Akola Police Force, was inaugurated by Guardian Minister Adv. Akash Fundkar.
अकोला : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वारंवार गुन्हे करून समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला पोलीस दलाने ‘त्रिनेत्र’ ही अत्याधुनिक प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेला देशातील या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांतील दोन हजारांहून अधिक गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून ‘त्रिनेत्र’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत वारंवार गुन्हे करणारे किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांचा डेटा संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. या माहितीचे तंत्रज्ञानाच्या मदतीने विश्लेषण करून संबंधित पोलीस ठाण्यांना ती माहिती पाठवली जाते, ज्यामुळे अट्टल गुन्हेगारांवर प्राधान्याने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, “ सुमारे ७० टक्के गुन्हेगार वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करून शिक्षा झाली तरी कारागृहातून बाहेर आल्यावर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. अशा गुन्हेगारांचा मागोवा घेऊन त्यांना परावृत्त करणे आवश्यक आहे. ‘त्रिनेत्र’ या प्रकल्पामुळे भविष्यातील गुन्हे रोखता येतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल.”
फक्त नियंत्रणच नव्हे तर पुनर्वसनावरही भर देण्यात येणार असल्याचे चांडक यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासून ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळले, हे समजून घेतले जाईल. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे समुपदेशन केले जाणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न होईल. त्यामुळे गुन्हेगारी झपाट्याने कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोल्यातून सुरू झालेला हा पथदर्शी उपक्रम भविष्यात राज्यातील आणि देशातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरू शकतो.