NCP Ajit Pawar faction MP Praful Patel has given the slogan of self-reliance, except for Mumbai.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
“आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त मुंबईत महायुती सोबत एकत्र लढण्याचा विचार करत आहोत. मात्र, उर्वरित राज्यात आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या वाढीस चालना मिळेल ” असे महत्त्वाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता असून, महायुती व महाविकास आघाडी यांची रणनीती काय असणार याकडे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांना युती करायची असल्यास तो त्यांचा अधिकार असेल, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही.” याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मेघालय, मणिपूर आणि बिहार मधील निवडणुका लढवणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.
विदर्भ दौऱ्यात पटेल यांनी पक्षाच्या मंत्र्यांचेही कान टोचले. “ मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. दोन तास पर्यटकासारखे येऊन मुंबईला जाऊन अहवाल देण्यात काही अर्थ नाही. पालकमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रत्यक्ष मदत केली पाहिजे. अन्यथा आमचा पक्ष कसा वाढेल?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपले वक्तव्य हे केवळ विदर्भापुरते नसून राज्यातील सर्वच पालकमंत्र्यांसाठी असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. “आमच्या पालकमंत्र्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत तर पक्ष वाढणार नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले पालकमंत्री असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवणे आवश्यक आहे. सध्या पक्षाचे मंत्री बांधणीकडे हवे तसे लक्ष देत नाहीत,” असे ते म्हणाले.