कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नवरात्रोत्सवात नंदादिपाला खूप महत्त्व आहे. नंदादीप म्हणजेच अखंड नऊ दिवस प्रज्वलित राहत असलेली ज्योत. ही ज्योत देवीच्या पूजेचा एक भाग आहे. या ज्योतीमुळे प्रकाश निर्माण होतो. ऊर्जा-उष्णता तयार होते. ही उष्णता घटात पेरलेल्या बीजांना अंकुरण्यासाठी आणि अंकुरल्यावर पिकांची वाढ होण्यासाठी ताकद देत असते. ही उष्णता बीजांना आणि पिकांना जोम देत असते. याचबरोबर नंदादीप घरातील सात्त्विकता वाढवतो, नकारात्मक शक्तींना दूर करतो, घरात शांतता व सकारात्मकता आणतो आणि शुभ कार्यासाठी ऊर्जा देतो.
नंदादिपातील ज्योत अखंड प्रज्वलित राहण्यासाठी कापसाची वात वळून तयार केली जाते. नऊ दिवस-रात्र तेवत राहण्यासाठी वात जास्त लांब तयार केली जाते. उंच असलेल्या नंदादिपात तूप किंवा गोडेतेल घातले जाते. तूप किंवा खाद्यतेलामुळे जास्त काजळी धरत नाही आणि शुद्ध प्रकाश-ऊर्जा घटातील उगविणाऱ्या पिकांना मिळतो.
नंदादिपाचे महत्त्व
-
सात्त्विकता आणि सकारात्मकता: नंदादीप अखंड तेवत राहिल्यामुळे घरात सतत सकारात्मक लहरी प्रक्षेपित होतात, ज्यामुळे घरात सात्त्विकता वाढते.
-
नकारात्मक शक्तींचा नाश: हा दिवा ब्रम्हांडातून शक्ती तत्त्व आकर्षित करतो आणि घरातील किंवा मंदिरातील अनिष्ट, नकारात्मक शक्तींचा नाश करतो.
-
शांतता आणि ऊर्जा: अखंड ज्योतीमुळे घरात शांतता नांदते आणि शुभ कार्यांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळते.
-
प्रतिक: नंदादीप हे तेज तत्त्वाचे प्रतीक आहे आणि नवरात्रीमध्ये वातावरणात तेजाचे आधिक्य असते, म्हणून तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणे महत्त्वाचे मानले जाते.
- घटतील पिकांना ऊर्जा : अखंड नंदादिपामुळे घटातील पिकांची वाढ जोमात होते. बियांचे आंकुरण आणि पिकांची होत असलेली वाढ पाहून उत्साह वाढतो. उमेद येते.
नंदादीप कसा लावावा:
- नवरात्रीच्या घटस्थापनेच्या वेळी नंदादीप लावला जातो आणि तो नऊ दिवस तेवत ठेवला जातो.
- या दिव्यामध्ये खाद्य तेल किंवा तूप वापरले जाते. खाद्य तेल किंवा तूपामुळे काजळी जास्त होत नाही आणि शुद्ध प्रकाश मिळतो.
- हा दिवा घरातील पूजेच्या ठिकाणी तेवत ठेवला जातो, ज्यामुळे देवीच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते.
नवरात्रीत भक्तीचा, शक्तीचा जागर केला जातो. जागर करणे अर्थात जागृत राहणे. दिवा अखंड तेवत ठेवणे हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहे. जसा देव्हाऱ्यातील दिवा तेवत राहतो, तशी आपली जागृतावस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागील संकल्पना आहे. नव्हे तर ती जाणीव करून देणारे हे प्रतीक आहे.
——————————————————————————