मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले असून दिवाळी नंतर महापालिका निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. त्या आधी महत्त्वाचं पाऊल म्हणून राज्य निवडणूक आयोग सोमवारी बहुतांश महापालिकांच्या प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहे.
राज्यातील २९ महानगर पालिकांपैकी मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, नवी मुंबई आदी १० महापालिकांच्या प्रभाग रचना आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. तर ‘ड’ गटातील महापालिकांचे प्रस्ताव संबंधित स्थानिक संस्थांकडून मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे ‘ड’ वर्ग महापालिकांच्या प्रभाग रचना ३ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यावर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा निश्चित करून तो नगरविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे. नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम आराखडा सादर झाल्यानंतर आयोग त्यास मान्यता देऊन अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे.
वेळापत्रक असं –
-
२२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट : प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती मागवणे
-
२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर : हरकती व सूचनांवर सुनावणी
-
८ सप्टेंबर नंतर : शिफारशींचा विचार करून प्रभाग रचना अंतिम करून नगरविकास विभागाकडे पाठवणे
-
२२ ते २६ सप्टेंबर : नगरविकास विभागाने अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे
-
३ ते ६ ऑक्टोबर : राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देऊन अधिसूचना प्रसिद्ध करणे
दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर संबंधित महापालिकांच्या क्षेत्रात राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या हालचालींना वेग येणार असून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होणार आहे.
——————————————————————————————-