अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्राधिकरणाचा शुभारंभ गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र, जोतिबा ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीला या प्रक्रियेत सामावून घेतलेले नसल्याने स्थानिकांत नाराजी दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या पाहिल्या टप्प्यासाठी २५९. ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जोतिबा डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ४ वाजता तोरणाईचा कडा या ठिकाणी हा सोहळा संपन्न होईल.
प्राधिकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यापासून जोतिबा ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीला या प्रक्रियेत सामावून घेतलेले नाही त्याचबरोबर ग्रामस्थांची मते देखील जाणून घेतलेली नाहीत. यावरून जोतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यासंदर्भात जोतिबा ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक 3 रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांना जोतिबा ग्रामस्थांना प्राधिकरण राबवण्यापूर्वी विश्वासात घ्या, असे एक निवेदन देण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी दिनांक ५ जून रोजी ग्रामस्थांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याच दिवशी प्राधिकरणाच्या शुभारंभचा सोहळा होणार असल्याने जोतिबा ग्रामस्थांना चर्चेपासून पुन्हा डावलले जाणार का ? या शुभारंभ सोहळ्याची कल्पना जोतिबा ग्रामस्थांना का देण्यात आली नाही ? असे प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांना प्रशासनाकडून गुरुवारी ५ जून रोजी दुपारी अडीच वाजता चर्चेचं निमंत्रण दिल्याचे समजते. मात्र, त्यानंतर चार वाजता याचा शुभारंभ असून ही चर्चेचे निमंत्रण म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ग्रामस्थांना गांभीर्याने घेतले जात नसल्याने याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
———————————————————————————————–