महाबळेश्वर : प्रसारमाध्यम न्यूज
महाबळेश्वरच्या पायथ्याला वसवण्यात येणाऱ्या ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला आता अधिक वेग मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले असून, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत आहे.
या नव्या शहररचनेत सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यातील २९४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. सुरुवातीला या योजनेत २३५ गावांचा समावेश होता. मात्र, प्रकल्पाच्या व्यापकतेचा विचार करता आता ही संख्याच वाढवण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी नुकताच MMRDA कडून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नवीन महाबळेश्वर हे केवळ पर्यटनापुरते मर्यादित न राहता, ते एक नियोजनबद्ध, हरित आणि समृद्ध शहर म्हणून विकसित करायचं आहे. त्यामुळे या प्रकल्पात ग्रामविकास, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणसंवर्धन यांचा समावेश असणार आहे.या भागातील नैसर्गिक वैभव लक्षात घेता, डाबर, पतंजलीसारख्या आयुर्वेदीक औषधनिर्मिती कंपन्यांना येथे आमंत्रित करून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकात्मिक विकासाचे लक्ष्य –
या प्रकल्पांतर्गत रस्ते, जलसंपदा, ऊर्जा, पर्यटनस्थळांचा विकास, हरित पट्ट्यांची उभारणी तसेच स्थानिक रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा भार मुंबई किंवा पुण्याच्या वर पडणार नाही, तर एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण शहर म्हणून नवीन महाबळेश्वर उभं राहणार आहे.
स्थानिकांचा सहभाग आणि संवाद –
या भागातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. त्यांचं पुनर्वसन, रोजगार संधी आणि मूलभूत सोयीसुविधा यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर’-
सह्याद्रीच्या कुशीत वसणाऱ्या या नव्या शहराचं नियोजन शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक स्तरावर पर्यटन आणि विकासाच्या दृष्टीने एक नवं परिमाण मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सह्याद्रीच्या कुशीत उभारण्यात येणाऱ्या ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला आता औषधी वनस्पतींचा नैसर्गिक ठेवा आणि पर्यटनदृष्ट्या निसर्गरम्य परिसर यामुळे नवे परिमाण लाभण्याची चिन्हं आहेत.
वेलनेस टुरिझमला चालना – “या परिसरातील वैविध्यपूर्ण औषधी वनस्पती, स्वच्छ हवामान आणि शांत परिसर पाहता, वेलनेस सेंटर, निसर्गोपचार केंद्रे, योगधाम, आरोग्यधाम उभारण्यासाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे. त्यामुळे अशा संस्थांना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून स्थानिकांना इथेच उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील,” असेही शिंदे म्हणाले.
पर्यटनाच्या नव्या शक्यता – या भागात असलेले नैसर्गिक धबधबे, तलाव, ऐतिहासिक मंदिरे यांचा उपयोग पर्यटनासाठी अधिक व्यापक पातळीवर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तापोळा येथील उत्तेश्वर मंदिर आणि उत्तेश्वर रोप वे या प्रकल्पांची प्रगतीही त्यांनी पाहिली आणि या कामांना गती देण्याचे आदेश दिले.
पर्यावरणस्नेही पायाभूत सुविधा – नवीन महाबळेश्वरमध्ये इको-फ्रेंडली रस्त्यांचे विकास, पुलांच्या खाली सुशोभीकरण, राडारोडा हटवून योग्य सुरक्षितता यंत्रणा उभारणे, पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करणे यावर भर देण्यात येणार आहे. MSRDC ला दिलेल्या विविध प्रकल्पांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल यासाठीही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
झोपडपट्टी पुनर्विकासात सहभागाची अपेक्षा – MSRDC नेही आता सिडको आणि MMRDAप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
काय आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्प ?
- गावे : १०१ (सातारा), १९३ (पाटण), ४९ (जावळी) – एकूण २९४ गावे
- क्षेत्रफळ : १,१५,३०० हेक्टर
- भौगोलिक स्थान : समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंची
- नद्या : सोळशी, उरमोडी, कांदाटी
- वैशिष्ट्ये : घनदाट जंगल, वन्यजीव, औषधी वनस्पती, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू
हा संपूर्ण परिसर गिरीस्थान म्हणून विकसित होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, पर्यावरण पूरक शहर उभारणीचा एक आदर्श नमुना म्हणून हे प्रकल्प पुढे येऊ शकतो.
—————————————————————————————-