नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून ( २१ जुलै ) सुरू होत असून, या अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडून पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत-चीन सीमावाद, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातला दावा, तसेच बिहारमधील विशेष सघन आढावा (SIR) यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला असून, पंतप्रधानांनी यावर संसदेत उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी या बैठकीनंतर सांगितले की, “पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आहेत. संसदेमार्फत देशाला माहिती देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आम्ही चर्चा अपेक्षित ठेवतो.”
दुसरीकडे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आश्वासन दिलं की, “सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सभागृह सुरळीत चालवणं ही केवळ सरकारची नव्हे, तर सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील ट्रम्प यांच्या विधानालाही सरकार योग्य उत्तर देईल.”
या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी अध्यक्षता केली. बैठकीत अनेक वरिष्ठ मंत्री, एनडीए तसेच विरोधकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास दीड तासांहून अधिक काळ ही बैठक चालली. यात आगामी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर, विरोधकांच्या मुद्यांवर आणि सभागृह चालवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली.
संसदेच्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनीही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महत्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, “खासदारांनी भाषण करताना मर्यादित आणि संसदीय भाषेचा वापर करावा. विचारात मतभेद असू शकतात, परंतु कटुता ठेवू नये. सभागृहात गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा व्हावी, हे प्रत्येक पक्षाने लक्षात ठेवावे.”
२१ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान होणार महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा
या पावसाळी अधिवेशनात सरकार महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, देशातील विविध घडामोडींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा होण्याची शक्यता असून, संसदेतील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. या अधिवेशनाकडे देशभराचे लक्ष लागले असून, लोकशाहीच्या मंदिरात केवळ राजकारण नव्हे, तर जनतेच्या अपेक्षांनुसार ठोस निर्णय घेण्याच्या दिशेने हे अधिवेशन मार्गक्रमण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
————————————————————————————



