कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज, २४ मे रोजी कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण असून, दुपारनंतर गडगडाटी वादळांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुपारी एक वाजल्यापासून पावसाची शक्यता ७० % असून, संध्याकाळपर्यंत ती वाढून ९० % पर्यंत जाऊ शकते. कमाल तापमान सुमारे ३०°C असून, आर्द्रता ८६ % आहे. वाऱ्याचा वेग सुमारे १.९ किमी प्रती तास राहणार आहे.
कोल्हापुरात गेल्या चार दिवसापासून ऐन उन्हाळ्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या या पावसाने गेल्या दीड दशकातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कृषी विभागाच्या एका अहवालानुसार जिल्ह्यात २३ मे पर्यंत सरासरी १२८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ही नोंद मागील दीड दशकातील सर्वाधिक आहे. मे महिन्याची सरासरी ( ५१.५) मि.मी. गाठल्यानंतरही पावसाचे सत्र सुरूच आहे.
कोल्हापुरात यंदा उन्हाळ्यात पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली आहे. मे महिन्याच्या सुरू झालेल्या वळीव पावसाने नवे विक्रम प्रस्थापित केले. पावसाळ्यासारखा पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भागांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे.
मे महिन्यात कोल्हापुरात यापूर्वी असा धुवाँधार पाऊस – २०२१ ( १२६.४ मि.मी.), २०२२ – (६६ मि.मी.), आणि २०१५ – (५० मि.मी.) साली झाला होता.
मात्र, यंदाचा पावसाने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. २००६ नंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. २००६ साली सात दिवसांत १९५.४ मि.मी. पाऊस झाला होता. गत वर्षी (२०२४) कोल्हापुरात ६२.३ मिमी पाऊस झाला होता, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण तब्बल दुप्पट आहे.
—————————————————————————————