राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यात दमदार पावसामुळे डोंगरदरे हिरवे गच्च झालेले आहेत. डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि मान्सूनचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी राधानगरी तालुक्यात वर्षा पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अभयारण्याची स्वागत कमान असलेल्या मांजरखिंड ते काळमवाडीतल्या दुधगंगा धरणापर्यंतचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे दुरावस्था झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचले आहे यामुळे या मार्गावरील प्रवाशांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळं पर्यटकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. कोणाचा जीव गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या मार्गावर खड्डे पडलेल्या ठिकाणी किमान मुरूम टाकून खड्डे मुजवावेत, अशी मागणी होत आहे.