कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खरीप हंगामातर्गत पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा काढण्यासाठी पिक कापणी प्रयोग राबविले जात आहेत. जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता देश आणि राज्याच्या सरासरीच्या तुलनेत चांगली असून, यावर्षी विविध उपक्रमांद्वारे उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाला दिल्या. दसरा चौक येथील शाहू स्मारक सभागृहात कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील सर्व तालुक्यांतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, नामदेव परिट यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, पिकांच्या पूर्वानुमानासाठी आवश्यक असणारी अचूक माहिती वेळेवर उपलब्ध करून द्या. यावरून आणि मागील दहा वर्षांच्या सरासरीनुसार पिकांची पैसेवारी निश्चित केली जाते. पिक कापणी प्रयोगातील बदल आत्मसात करून सीसीई ॲग्री ॲपवर माहिती भरा. ऊस शेतीनंतर भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे. प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या मार्गदर्शनानुसार गावपातळीवर अचूक प्रयोग राबवा. चुका होणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यासाठी चांगले पर्यवेक्षण करा. जिल्ह्यातील उत्पादकतेचे खरे चित्र समोर येण्यासाठी हा उपक्रम यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
त्याचबरोबर, शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील उर्वरित काम पूर्ण करून पीएम किसानच्या लाभार्थ्यांची प्राधान्याने नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक मदत वेळेत मिळेल यासाठी नियोजन करून अपघातग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत स्वतः जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रत्येक गावात एक उपक्रम राबवला जाईल असे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात चांगले काम केल्याबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन केले.