कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात मागील वर्षात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पूर परिस्थितीचा संबंधित यंत्रणांनी अभ्यास करुन त्या अनुभवावर यावर्षी पूर परिस्थिती निर्माण झाली तर कसे सामोरे जावे, यांचे सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर – अतिवृष्टीमुळे मागच्या वेळी कोल्हापूर शहरातील नाले काही ठिकाणी बंद झाल्यामुळे शहरात जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक यंत्रणा बिघडली होती. नागरिकांना जाण्यासाठी रस्ते बंद झाले होते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील साचलेले पाणी योग्य निचरा होण्यासाठी नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे, जास्त पाणी साचल्यामुळे त्या पाण्याचा निचरा कसा करता येईल याचे नियोजन करावे, शहरात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या अशा सूचना त्यांनी दिल्या.
सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करा. पुरामुळे नागरिकांचे नुकसान होवू नये, यासाठी अलमट्टी धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावे याची एक एसओपी तयार करा, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने पाण्याचा विसर्गाबाबत समन्वय ठेवून नियोजन करावे, सर्व यंत्रणांनी आपआपली जबाबदारी ओळखून कामकाज करावे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार ठेवावी. यामध्ये उणिवा राहू नये याची खबरदारी घ्या. पूर परिस्थितीवेळी आरोग्य, कृषि, महसूल, महावितरण इतर संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, जी गावे भूस्खलन मध्ये येतात त्या गावाचे ऑडीट करण्यासाठी समिती गठीत करावीत, बरेच ठिकाणी गावातील नागरिकांकडून माती उकरुन काढली जाते त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडू नये, यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी याबाबत गावातील नागरिकांना सूचना द्याव्यात.
आमदार अमल महाडिक – पावसाळयात नागरिक हे धबधबा व धरणावर फिरायला जातात अशावेळी नागरिकांना प्रशासनामार्फत सूचना दिल्या जाव्यात तसेच जिल्ह्यातील वापरात नसलेले जुन्या पुलावरुन वाहने चालवू नये, यासाठी प्रशासनामार्फत सूचना देण्याबाबत सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे – भूस्खलन गावांचे ऑडीट करण्यासाठी समिती गठीत करुन अभ्यास केला जाईल, तसेच त्या गावांचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी आयआयटी मंडी यांच्यासोबत करार झाला आहे. त्यांच्या कडून याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचा अहवाल आला की, याबाबत पुढील नियोजन करु. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत केलेले नियोजन व उपाययोजना बाबत माहिती दिली. यावेळी श्री. आपत्ती व्यववस्थापन अधिकारीऱ्यांनी पूरस्थितीची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.
उपस्थिती – आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हैत्रे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कोल्हापूर महानगरपालिका उपआयुक्त राहूल रोकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
————————————————————————————————-



