मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी बांधवांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना शेती विषयक सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ महाविस्तार ’ नावाचे नवे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. ‘ शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ’ अशी ओळख मिळवणारे हे अॅप आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
सर्व माहिती एका क्लिकवर
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेती संबंधित जवळपास सर्वच गोष्टींची माहिती सहज मिळणार आहे. हवामान अंदाज, पिकांसाठी योग्य सल्ला, लागणाऱ्या खतांची अचूक मात्रा, कीड व रोगांवरील उपाययोजना, तसेच बाजारभाव यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे शेतकरी योग्य वेळी निर्णय घेऊन उत्पादन आणि नफा वाढवू शकतील.
अवजारे बँक व योजनांची माहिती
या अॅपवरून गावाजवळील अवजारे बँकांची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर सहज मिळू शकणार आहे.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाडीबीटी वरील सर्व योजना, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती या अॅपमध्ये एकत्रित दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.
‘महाविस्तार’मध्ये ऑनलाइन शेती शाळा हा खास विभाग असून, शेतीत वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावरील व्हिडिओ शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता येतील. यामुळे नवीन पद्धती आत्मसात करून शेतकरी आपली शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवू शकतात.
शंका निरसन व अधिकारी संपर्क
शेतकऱ्यांच्या शंकांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी अॅपमध्ये ‘मला प्रश्न विचारा’ हा विभाग उपलब्ध आहे. येथे शेतकरी आपले प्रश्न थेट विचारू शकतात आणि कृषी तज्ज्ञ त्याचे उत्तर देतात. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे. गरज भासल्यास शेतकरी मोबाईलवरूनच अधिकाऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती मिळवू शकतात.
वापरण्याची सोपी पद्धत
शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार’ अॅप मोफत डाउनलोड करावे. त्यानंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉग-इन करून नाव, गाव आणि तालुका प्रविष्ट केल्यावर गावनिहाय आणि तालुकानिहाय सर्व माहिती थेट उपलब्ध होईल.
हवामानातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव किंवा बाजारातील चढ-उतार यावर आता शेतकरी एका मोबाईल अॅपद्वारे सजग राहू शकतील. शासनाच्या या उपक्रमामुळे शेती अधिक शाश्वत, स्पर्धात्मक आणि फायद्याची होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ‘महाविस्तार’ हे शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि माहिती यांचा संगम ठरणार आहे.
————————————————————————————————–



