अनिल जासुद : कुरुंदवाड
कोयना…वारणा…राधानगरी धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग तसेच गेले दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात मंडपात शनिवारी सकाळी कृष्णा नदीचे पाणी शिरले. पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहिल्यास शनिवारी मध्यरात्रीनतंर किंवा रविवारी कोणत्याही क्षणी यावर्षीचा पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी पुराचे पाणी श्रीं च्या मंदिराच्या कट्ट्याजवळ पोहचले. यामुळे उन्हाळ्यात भाविकांच्या सावलीसाठी उभारण्यात आलेला मंदिरासमोरील मंडप देवस्थान समितिने सुरक्षितपणे उतरुन घेतला आहे. मंदिरा समोर सध्या गुडघ्याएवढे पाणी आहे. तरीही भाविक या पाण्यातूनच दर्शन घेत आहेत.
आज शनिवार असल्याने श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यासाठी देवस्थान समितीने आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय ?
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पुर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते. जेंव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते, तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तर द्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करुन श्रीं च्या मनोहर पादुकांना स्पर्श करुन मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. दक्षिणद्वार सोहळ्यात पुण्य स्नानपर्वणीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविक मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये येतात.
एकंदरीत, श्रीकृष्णामाईचे पाणी उत्तर द्वारातून देवांच्या पादुकांवरून वाहून दक्षिणद्वारावाटे विपुल प्रमाणात बाहेर पडत असताना त्यात स्नान करण्यासाठी भाविक दक्षिणद्वार होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. आज शनिवारी मध्यरात्रीनतंर कोणत्याही क्षणी दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे.
————————————————————————————————-