कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
‘आपले आरोग्य आपल्या हातात’ अशी एक म्हण आहे. ही म्हण सार्थ करायची असेल तर प्रत्येकाने स्वत:साठी फक्त दहा मिनिटे वेळ द्यायला हवा. रोजच्या दहा मिनिटानीही आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो. ठराविक व्यायाम, योगासने दररोज न चुकता केले तरी आपली शारीरिक आणि मानसिक प्रकृती सदृढ राहू शकते.
रोज आपण घरातील आणि नोकरी-व्यवसायातील कामात गढून गेलेलो असतो. यानिमित्त प्रवासाठी आपला बऱ्यापैकीवेळ जातो. या धावपळीत आपण स्वत:साठी कधी वेळच देत नाही. मात्र अचानक आपल्याला कोणताही आजार उदभवला तर या आजारातून बरे व्हायला वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवस जातात आणि प्रकृतीही नाजूक बनते. पैसेही खर्च होतात. रुग्णालायात, घरात थांबावे लागल्यामुळे मानसिक खच्चीकरण होते ते वेगळेच. आपण स्वत:साठी फक्त दहा मिनिटे दिली तर हे टाळता येवू शकते.
हृदयविकार, मधुमेह, पोटाचे विकार, श्वसनाचे विकार, सांधेदुखी हे विकार-दुखणे आपण नियमित व्यायाम, योगासनांमुळे रोखू शकतो. या आजारांचा थेट संबध अनियमित दैनंदिन दिनचर्येशी असतो. आपल्या रोजच्या व्यायामामुळे असे आजार आपल्या जवळपास पोहचत नाहीत.
काहीही झाले तरी आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला पाहिजे. तरच आपण स्वत:ला वाचवू शकतो, टिकवू शकतो. व्यायामामुळे भूक लागते, झोप लागते. घाम, शौच, मुत्र यांचा निचरा वेळच्या वेळी होतो. यामुळे प्रसन्न वाटते. उत्साह वाढतो.
दहा मिनिटात योगासने, प्राणायाम, सायकलिंग, सांध्यांचे व्यायाम करू शकतो. व्यायाम, योगासने करताना स्वतःची शारीरिक क्षमता, वय याचा विचार करूनच करावा. जिथपर्यंत आपल्या शरीर प्रकृतीला पेलवेल तितकेच करावेत. व्यायामाची, योगासनाची सुरुवात केल्यानंतर हळू हळू वाढवावा. पहिल्याच दिवशी क्षमतेपेक्षा जास्त केल्यास दुसऱ्या दिवसापासून व्यायाम, योगासने बंद होतील. म्हणूनच आपण आपल्या व्यस्त जीवनचर्येतून दररोज फक्त दहा मिनिटे काढूया!