spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशिक्षणमाध्यमांचा सजग वापर गरजेचा : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

माध्यमांचा सजग वापर गरजेचा : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांचं दिमाखदार प्रकाशन

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

समाज आणि माध्यमं या पुस्तकातून डॉ.अलोक जत्राटकर यांनी नवमाध्यमांतील त्रुटींची अतिशय परखडपणे जाणीव करून दिलेली आहे. समाजाविषयीची चिंता, तळमळ त्यामध्ये आढळते. ते नकारात्मक नाहीत, पण सकारात्मक वापरासाठी, अभिव्यक्तीसाठी आग्रही आहेत. समाजाने त्यांची दखल घेऊन या माध्यमांचा सजग वापर करणे आवश्यक असल्याचे प्रांजळ मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना कुलगुरू डाॅ.दिगंबर शिर्के
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रह आणि ‘समाज आणि माध्यमं’ हे अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या माध्यमविषयक पुस्तकांचा संयुक्त प्रकाशन सोहळा येथील राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून जगण्याचे, जीवनाचे एक मूल्य त्यांनी सांगितले आहे. एक संवेदनशील लेखक, माणूस म्हणून ते वाचकांच्या हृदयाला हात घालत असल्याचे ते म्हणाले.

डॉ.अशोक चौसाळकर ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावर बोलताना म्हणाले, संदेश प्रसार आणि अभिव्यक्तीसाठी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही माध्यमे होती; केवळ त्यांचे स्वरुप वेगळे होते. माध्यमे असल्यामुळेच भगवान बुद्ध, महंमद पैगंबर, शंकराचार्य यांचे संदेश सर्वदूर पसरले. पानिपतच्या लढाईतील पराभवाची बातमी महाराष्ट्रात पोहोचण्याला दोन महिने लागले. व्यापाऱ्यांच्या संदेशाच्या माध्यमातून ती येथपर्यंत आली. हे स्वरुप बदलत आता आधुनिक स्वरुपाला येऊन ठेपले आहे. स्वच्छ अभिव्यक्ती ही आजची गरज आहे. माध्यम आणि अभिव्यक्ती साक्षरता ही काळाची गरज आहे. त्यामध्येही माध्यमांना मोलाची भूमिका बजावण्याची संधी आहे. डॉ. जत्राटकर यांची दोन्ही पुस्तके चांगली झाली असून येथून पुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या निर्मितीची अपेक्षा त्यांचा शिक्षक म्हणून मी बाळगून आहे, असेही चौसाळकर म्हणाले.

यावेळी दोन्ही पुस्तकांवर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी भाष्य केले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांना प्रस्तावना लिहीणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रकाशित पुस्तके प्रथम भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. जत्राटकर यांचे गुरू डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ संपादक दिलीप लोंढे, संजय पाटोळे आणि डॉ. विजय चोरमारे यांचा कृतज्ञता सत्कार कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर अमेय जोशी यांनी आभार मानले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एन.डी. जत्राटकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. विनोद कांबळे, डॉ. जगन कराडे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. जी.पी. माळी, डॉ. इस्माईल पठाण, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. श्रीराम पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments