कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यावर्षी हंगामी पावसास महिनाभर आदीच सुरुवात झाली आहे. पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पडल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. सध्या जिल्ह्यातील प्रमुख १७ धरणांमध्ये सरासरी ८७ टक्के पाणीसाठा आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जुलैच्या १५ तारखेपर्यंत धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा असावा. धरणातील जादा पाणीसाठा धोकादायक ठरतो.
कोल्हापूर जिल्ह्यात लहान-मोठे ८३ बंधारे असून प्रमुख १७ धरणे आहेत. बहुतांशी बंधारे ८५ टक्के भरली आहेत तर लहान बंधारे शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख १७ धरणांमध्ये सरासरी ८९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २५ टीएमसीने जास्त आहे. राधानगरी धरण ९० टक्के तर दुधगंगा धारण ८० टक्के भरले आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच ८० टक्के धरणे भरल्याने जिल्हा प्रशासन हडबडले आहे. कारण इतके पाणी धरणात असेल तर दोन महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवायचे कसे, भविष्यात धरणाखालील गावाना याचा धोका उद्भवू शकतो, म्हणून पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच धरणामध्ये इतके पाणी ठेवायचे नसते असे सूत्र आहे. म्हणून पाटबंधारे विभाग बंधारे व धरणातील पाणी पातळी ६० टक्के पर्यंत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
—————————————————————————————————