मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र “ डेटा सेंटर कॅपिटल ” आणि “ सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल ” बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उत्पादन क्षेत्र, लॉजिस्टिक आणि वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे यामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, “गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत व्हावी यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळाली आहे. आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पुन्हा पुढे सरकत आहे. हा प्रकल्प लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल.”
आज मंत्रालयातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ सामंजस्य करार (MoUs) आणि २ रणनीतिक करार झाले. या करारांमधून राज्यात तब्बल ४२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
झालेले करार :
-
ज्युपिटर इंटरनॅशनल लि.- सोलर पॅनेल निर्मितीसाठी १०,९०० कोटी; ८,३०८ रोजगार
-
रोचक सिस्टिम्स प्रा. लि. – डेटा सेंटरसाठी २,५०८ कोटी; १,००० रोजगार
-
रोव्हिसन टेक हब प्रा. लि. – डेटा सेंटरसाठी २,५६४ कोटी; १,१०० रोजगार
-
वॉव आयर्न ॲण्ड स्टील प्रा. लि. – पोलाद उद्योगासाठी ४,३०० कोटी; १,५०० रोजगार
-
वेबमिंट डिजिटल प्रा. लि. – डेटा सेंटरसाठी ४,८४६ कोटी; २,०५० रोजगार
-
ॲटलास कॉपको – औद्योगिक उपकरणे क्षेत्रासाठी ५७५ कोटी; ३,४०० रोजगार
-
एलएनके ग्रीन एनर्जी – हरित ऊर्जा प्रकल्पासाठी ४,७०० कोटी; २,५०० रोजगार
-
प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि. – डेटा सेंटर, लॉजिस्टिक व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी १२,५०० कोटी; ८,७०० रोजगार
रणनीतिक करार :
-
ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर – महाराष्ट्रात यूके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य.
-
टीयूटीआर हायपरलूप प्रा. लि. – जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारणीसाठी करार.