Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखादा निर्णय घेण्याआधी आतून एक हलकीशी कुजबुज ऐकू येते?

“हे करू नकोस”  किंवा “हा मार्ग योग्य आहे”

बाहेरून पाहिलं तर तुमचं लॉजिक, आकडे, अनुभव काहीतरी वेगळंच सांगत असतात. पण आत कुठेतरी एक शांत खात्री असते. आपण यालाच अनेकदा gut feeling, sixth sense किंवा inner voice म्हणतो.
मात्र प्रश्न असा आहे की हा आवाज नेमका कुठून येतो? तो खरा असतो की केवळ मनाचा खेळ? कारण अनेक वेळा भीती, इच्छा किंवा अहंकार हेही अंतर्ज्ञानाचा मुखवटा घालून आपल्याला फसवू शकतात.

याच गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आज आपण  अंतर्ज्ञान (Intuition) या विषयाकडे अंतरप्रेरणेच शास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनांतून सखोलपणे पाहणार आहोत.

अंतर्ज्ञान म्हणजे नेमकं काय?

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर,
अंतर्ज्ञान म्हणजे कोणताही तर्क, विश्लेषण किंवा विचार न करता थेट मिळणारं ज्ञान.

लॉजिक म्हणतं “मला डेटा हवा, वेळ हवा.” पण
 अंतर्ज्ञान म्हणतं  “मला आधीच माहीत आहे.”

अंतरप्रेरणेच्या तत्त्वज्ञानानुसार आपल्या अस्तित्वात बुद्धी नावाची एक उच्च क्षमता आहे. ही केवळ बौद्धिक बुद्धिमत्ता (intellect) नाही, तर सत्याचं प्रतिबिंब पाहण्याची क्षमता आहे.
जेव्हा ही बुद्धी भीती, इच्छा आणि जुन्या संस्कारांच्या ढगांनी झाकलेली नसते, तेव्हा ती स्वच्छ आरशासारखी होते. त्या आरशात जे स्पष्टपणे दिसतं, तेच म्हणजे अंतर्ज्ञान.

आधुनिक जगात मात्र आपण सतत माहिती, मतं, सल्ले आणि आवाजांनी वेढलेले असतो. त्यामुळे हा आतला आवाज हरवत नाही, पण गोंगाटात दडपला जातो.

इन्स्टिंक्ट, कल्पना आणि अंतर्ज्ञान : गोंधळ कुठे होतो?

सर्वात मोठा गोंधळ इथेच होतो, कारण हे तिन्ही आवाज आपल्याला आतून च येत असल्यासारखे वाटतात.

1. Instinct  इन्स्टिंक्ट (सहज प्रवृत्ती)

इन्स्टिंक्ट ही पूर्णपणे जैविक आणि शारीरिक बुद्धिमत्ता आहे.
ती एकच प्रश्न विचारते  “मी सुरक्षित आहे का?”

उदाहरणार्थ,
रात्री एखाद्या अनोळखी, अंधाऱ्या गल्लीत जाताना अस्वस्थ वाटणं.
पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं.

हे अंतर्ज्ञान नाही, तर धोक्याची शारीरिक सूचना आहे. ही सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे  माणसात आणि प्राण्यांत समान पद्धतीने असते.

2. इमॅजिनेशन (कल्पनाशक्ती)

कल्पना म्हणजे मनाने तयार केलेल्या कथा.
त्या आठवणी, भीती आणि इच्छांवर आधारलेल्या असतात.

उदाहरण –
तुम्ही एखाद्याला महत्त्वाचा मेसेज पाठवला, समोरच्याने वाचला पण उत्तर दिलं नाही.
मन लगेच १०० शक्यता तयार करतं 
“तो नाराज झाला असेल का?”
“मी काहीतरी चुकीचं बोललो का?” ही कल्पना आहे. यात निश्चितता नसते, उलट अस्वस्थता वाढते.

3. अंतर्ज्ञान (Intuition)

अंतर्ज्ञान म्हणजे विचार न करता थेट मिळणारं शांत ज्ञान.
त्याचा संबंध योग्य काय आहे याच्याशी असतो   सुरक्षिततेशी किंवा शक्यतांशी नाही.

याचे उदाहरण बघा 
तुमच्यासमोर दोन चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. पगार, पद, सुविधा सगळं जवळपास समान.
पण एका पर्यायाचा विचार करताच आतून शांत, स्थिर भावना येते,
तर दुसऱ्याचा विचार करताच सूक्ष्म अस्वस्थता जाणवते.

हे अंतर्ज्ञान आहे. ते ओरडत नाही. ते फक्त दिशा दाखवतं.

भीती, इच्छा आणि अंतर्ज्ञान यातील फरक कसा ओळखायचा?

हे ओळखणं अवघड असतं, कारण भावना खूप प्रबळ असतात.

  • भीती :– नेहमी तातडी निर्माण करते. “आत्ताच काहीतरी कर!” असा दबाव आणते.

  • इच्छा :– उत्साह, अधीरता आणि आकर्षण निर्माण करते.

  • अहंकार :– “मीच बरोबर आहे” हे सिद्ध करण्याचा आग्रह धरतो.

  • अंतर्ज्ञान :– शांत, स्थिर आणि स्पष्ट असतं. ते वाद घालत नाही, स्वतःला सिद्ध करत     नाही.

सुवर्ण नियम
खरं अंतर्ज्ञान तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी कधीही दबाव टाकत नाही.
ते एकदा शांतपणे दिसतं आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मोकळं सोडतं.

स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा 
जर मी भीती आणि इच्छा पूर्णपणे बाजूला ठेवल्या, तर काय सत्य वाटतं ?
उरलेली शांत भावना म्हणजे अंतर्ज्ञान.

काही लोक जन्मतःच जास्त अंतर्ज्ञानी का असतात?

याला ‘देणगी’ म्हणण्यापेक्षा Carry Forward Intelligence म्हणणं अधिक योग्य ठरेल.

अंतरप्रेरणेच्या कर्मसिद्धांतानुसार,
जर एखाद्या आत्म्याने मागील जन्मांत संयम, चिंतन आणि आंतरिक सत्यावर विश्वास ठेवलेला असेल,
तर त्याची बुद्धी हळूहळू शुद्ध होत जाते.
हे शुद्धीकरण स्मृती म्हणून नाही, तर संस्कार म्हणून पुढच्या जन्मात येतं.

म्हणूनच काही मुलं लहानपणापासूनच खोटेपणा ओळखतात, लोकांचे हेतू समजून घेतात.

कार्ल युंग  (हे एक स्विस मानसशास्त्रज्ञ)

कार्ल युंग यांनी Collective Unconscious ही संकल्पना मांडली.
त्यांच्या मते, मानवजातीच्या सुरुवातीपासूनचे अनुभव, प्रतीकं आणि ‘Archetypes’ (आर्किटाइप्स चा मराठीत अर्थ मूलरूप, आदिप्ररूप, आदर्श नमुना किंवा पुरातन प्रतिमा असा होतो)

एका सामूहिक मनात साठलेले आहेत.

अंतर्ज्ञान म्हणजे या सामूहिक ज्ञानसागरातून योग्य माहिती मिळवण्याची क्षमता.

म्हणजे तर्काच्या पलीकडे ज्ञानाचा एक विशाल स्रोत उपलब्ध आहे.

  • अंतर्ज्ञानी लोकांचं आयुष्य सोपं का नसतं?
  • कारण अंतर्ज्ञान आरामात नव्हे, तर विरोधाभासातून तीव्र होतं.
  • वेदना, विश्वासघात आणि अडचणी माणसाला बाहेरच्या जगातून आत पाहायला भाग पाडतात.
    अडचण ही शिक्षा नसून अंतर्ज्ञानासाठीची ट्रेनिंग आहे.
  • जसं स्नायू व्यायामाने बळकट होतात, तसंच अंतर्ज्ञान आव्हानांमुळे अचूक होतं.

डेस्टिनीचं ‘Edit Button’

सामान्यतः आयुष्य कर्म → प्रतिक्रिया → नवीन कर्म या चक्रात चालतं.
पण अंतर्ज्ञान या दोन क्षणांमध्ये एक छोटी जागा निर्माण करतं.

याच हि उदाहरण आपण पाहू 
आर्थिक फसवणुकीचा योग असलेली व्यक्ती.
लॉजिक म्हणेल   “रिटर्न्स छान आहेत.”
पण अंतर्ज्ञान म्हणेल   “काहीतरी बरोबर वाटत नाही.”

जर त्या शांत आवाजाकडे लक्ष दिलं, तर व्यक्ती कर्माचा परिणाम टाळू शकते.
हेच ते डेस्टिनीचं एडिट बटन.

अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी व्यावहारिक उपाय

1. Stillness Test (स्थिरता चाचणी)                                                  भावना आली की थांबा.
जर काहीच केलं नाही तरी ती भावना तशीच राहते का? ते पहा 
राहिली तर अंतर्ज्ञान
वाढली तर भीती/इच्छा
नाहीशी झाली तर कल्पना

2. Low-stakes Moments वर सराव
मोठे निर्णय थेट अंतर्ज्ञानावर घेऊ नका.
छोट्या गोष्टींमध्ये आतल्या प्रतिक्रियांकडे लक्ष द्या.

3. 24 Hour Rule
मोठ्या निर्णयांसाठी २४ तास थांबा.
अंतर्ज्ञान शांत राहील, बाकी आवाज बदलतील.

4. Silence Discipline (मौन साधना)
दररोज किमान १० मिनिटे काही न करता शांत बसा.
गोंगाट कमी झाला की आतला आवाज ऐकू येतो.

 Spiritual High म्हणजे दिव्यानुभूती किंवा अध्यात्मिक परमानंद आणि खरी परिपक्वता

त्या एखाद्या क्षणी तुमचं मन शांत झाल्यामुळे आणि अहंकार तात्पुरता बाजूला झाल्यामुळे बुद्धीचा आरसा स्वच्छ होतो आणि तुम्हाला अंतर्ज्ञानाचा स्पष्ट अनुभव येतो आपल्याला वाटतं की आपल अंतर्ज्ञान जागृत झाला आहे.

जेव्हा अहंकार अध्यात्मिकतेचा मुखवटा घालून परत येतो मन म्हणायला लागतं मी आता अंतर्ज्ञानी झालो आहे किंवा माझ्याकडे विशेष शक्ती आहे.  ज्या क्षणी तुम्ही मी अंतर्ज्ञानी आहे असा मालकी हक्क सांगता त्याच क्षणी तो प्रवाह अरुंद होतो कारण अंतर्ज्ञान हे रिकाम्या जागेतून शून्यतेतून वाहते अहंकाराच्या ‘मी’ पणाच्या ओळखीमधून नाही. म्हणजे ते नाहीस होणं हे अपयश नाही. उलट या अनुभवानंतर अंतर्ज्ञान कमी झाल्यासारखं वाटणं हे अपयश नाही तर
प्रगतीचे लक्षण आहे.  प्रगतीचे लक्षण कसं ? तर याचा अर्थ तुमची चेतना आता त्या उत्साहाशिवाय त्या नाट्यमयतेशिवाय काम करायला शिकत आहे. खऱ्या अर्थाने परिपक्व अंतर्ज्ञान हे ड्रामॅटिक नसतं ते श्वासासारखं सहज आणि सामान्य होऊन जातं.

अंतर्ज्ञान ही काही “मिळवायची” शक्ती नाही. ती आंतरिक प्रामाणिकपणाचा उपउत्पाद (by-product) आहे.

आपण जितके स्वतःशी प्रामाणिक होऊ,
तितके भीती, इच्छा आणि अहंकाराचे अडथळे कमी होतील,आणि आतला आवाज अधिक स्पष्ट होईल.

कदाचित,
या प्रामाणिकपणातच आपल्या आतल्या आवाजाची किल्ली लपलेली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here