Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकिटांवर थेट ३ टक्के सूट देण्याची नवीन योजना जाहीर केली आहे. ही सवलत रेलवन (RailOne) ॲपच्या माध्यमातून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार, ही योजना १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, देशभरातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे तिकीट काउंटरवरील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांना सोयीस्कर सेवा देणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत काय सुविधा होती ? 

सध्या रेलवन अॅपवरून आर-वॉलेट (R-Wallet) वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३ टक्के कॅशबॅक दिला जातो. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही कॅशबॅक योजना पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहे. म्हणजेच, आर-वॉलेट वापरणाऱ्या प्रवाशांना आधीचा लाभ मिळत राहील.

नवीन बदल काय आहेत? थेट सूट कशी मिळेल?

रेल्वे मंत्रालयाने आणलेली ही नवी योजना कॅशबॅकपेक्षा वेगळी आणि अधिक सोपी आहे.

ही सवलत फक्त रेलवन अॅपवरून अनारक्षित तिकीट खरेदी केल्यासच मिळेल

यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशा कोणत्याही डिजिटल पेमेंट मोडवर ही सूट लागू असेल

तिकीट बुक करतानाच तिकिटाच्या रकमेवर थेट ३% सूट मिळेल

इतर कोणत्याही ॲप किंवा ऑनलाइन अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्मवर ही योजना लागू नसणार

प्रवाशांना काय फायदा होणार?

या निर्णयामुळे रोज लोकल आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट आर्थिक बचत होणार आहे. शिवाय,

  • तिकीट काउंटरवरील रांगा कमी होतील,
  • कागदविरहित (Paperless) तिकीट प्रणालीला चालना मिळेल,
  • डिजिटल इंडिया उपक्रमाला बळ मिळेल,
  • योजनेचा आढावा कधी?

रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे की, मे २०२६ मध्ये या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला राहिल्यास ही योजना पुढे वाढवण्याची किंवा इतर सेवांवर लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच काय ?  

रेल्वेच्या या निर्णयामुळे डिजिटल तिकीट बुकिंग स्वस्त, सोपे आणि अधिक आकर्षक होणार आहे. अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना नक्कीच मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

या लिंक जाऊन तुम्ही RailOne हे ॲप डाऊनलोड करु शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=org.cris.aikyam

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here