कोल्हापूर प्रसारमाध्यम डेस्क
कोल्हापूरच्या सुपुत्राने जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या रडारवर असणाऱ्या तीन खतरनाक दहशतवाद्यांना कंठस्नान घालून संपूर्ण देशात कोल्हापूरचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी येथील श्रीधर पाटील या आयपीएस अधिकाऱ्याने हा पराक्रम केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कोतोली गावचे श्रीधर पाटील हे सध्या जम्मू काश्मीर येथील किश्तवाड रामबन या परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याच परिसरातील जंगलात काही दहशतवादी लपून बसले होते. या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर पोलीस दल, भारतीय सेना आणि सीआरएफ याचं या परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. रक्त गोठवणाऱ्या थंडीत जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढून श्रीधर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंठस्नान घालून देशाच्या शत्रूला मात दिली आहे. श्रीधर पाटील यांच्या या पराकारामामुळे कोल्हापूर जिल्ह्याची आणि शाहुवाडी तालुक्याची मान देश पातळीवर अभिमानाने उंचावली आहे.
शाहुवाडी तालुक्याला पराक्रमाची परंपराच आहे. शाहुवाडी तालुक्यातील तरुणांमध्ये भारतीय सेनेत दाखल होऊन देश सेवा करण्याची भावना आहे. सन २०१७ मध्ये गोगवे येथील संदीप माने हे जम्मू काश्मीर येथील पुंछ सेक्टर मध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले होते. मार्च २०२५ मध्ये शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील सुनिल गुजर हे मणिपूर येथे देशासाठी कार्य बजावत असताना दरीत कोसळून शहीद झाले होते. आज शाहुवाडी तालुक्याच्या याच पराक्रमी परंपरेला जागत आयपीएस श्रीधर पाटील यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करून कोल्हापूर जिल्ह्याचं आणि शाहुवाडी तालुक्याचं नाव देश पातळीवर गाजवलं आहे.






