अविनाश पाठक : नागपूर
अहमदाबाद विमानतळानजीक झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २३० प्रवासी अधिक १२ कर्मचारी अशा २४२ पैकी २४१ व्यक्ती ठार झाल्या. मात्र त्यातील एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावली. आणि ती व्यक्ती म्हणजे रमेश विश्वास.”समय से पहिले और तकदीर से ज्यादा कभी कुछ भी नही मिलता” अशा आशयाची एक हिंदी म्हण आहे. ही म्हण किती यथार्थ आहे हे या परिस्थितीत दिसून येते. यावेळी जर रमेश विश्वास यांची त्यांच्या नशिबात लिहिलेली मृत्यूची वेळ आली असती, तर ते देखील मृत्यूमुखी पडले असते. मात्र नियतीला त्यांचे मरण मान्य नव्हते. त्यामुळेच इतक्या भयाण दुर्घटनेतूनही ते जिवंत राहिले आणि आपल्या पायाने चालत ॲम्बुलन्स मध्ये जाऊन बसले.
रमेश विश्वास हे देखील विमानाचा अपघात झाला त्या दिवशी अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ घेतलेल्या एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या बोईंग विमानातील एक प्रवासी होते. ते विमानाच्या ११ क्रमांकाच्या आसनावर बसले होते. विमानाने टेक ऑफ घेतला आणि अवघ्या दोन मिनिटांत स्फोट होऊन पायलटचा विमानावरील ताबा सुटला, आणि विमानतळालगत असलेल्या मेडिकल कॉलेज होस्टेलच्या भोजन कक्षावर जाऊन ते विमान आढळले. त्यात विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर यांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे जळलेल्या अवस्थेत होते. मात्र, याच वेळी रमेश विश्वास हे विमानातून बाहेर चालत आले आणि समोरच्या ॲम्बुलन्समध्ये जाऊन बसले. सर्वांच्या दृष्टीने हा एक चमत्कारच होता काही माध्यमांनी या घटनेचे वर्णन करताना “देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण वापरली. मात्र रमेश विश्वास यांना नेण्यासाठी काळ निश्चित आला होता. मात्र त्यांची वेळ आली नव्हती.
वेळ आली नसली तर ती व्यक्ती कशी ना कशी वाचतेच, याचे आणखी एक उदाहरण काल दिसून आले.
अहमदाबादचेच किशन मोडा त्यांची पत्नी यशा, आई रक्षा, आणि मुलगा रुद्र हे चौघेही काल याच विमानाने लंडनला जाणार होते. ऐनवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे किशन मोडा प्रवासाला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पत्नी यशा, आई रक्षा आणि मुलगा रुद्र या तिघांना त्यांनी रवाना केले. विमानाने उड्डाण केल्यावर अवघ्या दोन मिनिटांत विमान कोसळले आणि त्यात रक्षा यशा आणि रुद्र जागीच ठार झाले. त्यांची वेळ आली होती मात्र, किशन मोडा यांची वेळ आली नव्हती. त्यामुळेच त्यांच्याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्या आणि ते विमानाबाहेरच राहिले. मात्र आई, पत्नी आणि मुलगा यांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह शोधणे हेच त्यांच्या वाट्याला आले.
त्या दिवशी या विमानाने प्रवासाला जाऊ न शकलेले आणखी एक गुजरातचे वृद्ध गृहस्थ असल्याचे काल माध्यमांवर दाखवले जात होते. या गृहस्थांना ऐनवेळी काहीच कारणामुळे त्यांचे लंडनला जाणे रद्द करावे लागले. नंतर या विमानाचा असा अपघात झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ते गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबीय परमेश्वराला धन्यवाद देत असलेले काल माध्यमांवर दाखवले जात होते.
आज २१ व्या शतकात आम्ही कितीही विज्ञाननिष्ठ असलो तरी शेवटी नियती ही काहीतरी शक्ती आहेच. त्यामुळे आम्ही कितीही ठरवले तरी जे घडायचे असते ते कधीच चुकत नाही.
ख्यातनाम मराठी साहित्यिक कै. पु. भा. भावे म्हणायचे की विश्व नियमानुसार चालते म्हणून मी नास्तिक नाही. मात्र भावेंच्या या मताशी मी (मी म्हणजे लेखक ) सहमत नाही. जर विश्व नियमानुसार चालले असते तर ठरल्याप्रमाणे दरवर्षी सात जूनलाच मान्सूनचा पाऊस कोसळला असता. नियमानुसार पाऊस पडल्यावर मग कुठे पूर येण्याची आणि पिके खराब होण्याची भीतीच राहिली नसती. त्या उलट पाऊस न पडल्यामुळे अवर्षण आणि त्यामुळे होणारे नुकसान हे देखील शंभर टक्के टळले असते. ठरलेले चार महिने ठरलेल्या प्रमाणात तापमान कमी होत थंडी पडली असती, आणि हळूहळू उन्हाळ्याकडे सरकली असती.
उन्हाळ्यातही ठरल्यानुसारच तापमान वाढले असते. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ, उष्माघात असे प्रकार झालेच नसते. हे सर्व प्रकार विश्व नियमानुसार चालत नाही, तर निसर्गाच्या आणि नियतीच्या लहरीनुसार चालते म्हणूनच होतात ना? आपण शेवटी नशिबात होते म्हणून हात चोळत बसतो. एकूणच काय तर हे विश्व नियमानुसार चालत नाही म्हणूनच मी आणि माझ्यासारखे अनेक लोक नास्तिक नाहीत, ते सर्व कुठेतरी परमेश्वरावर किंवा आपापल्या धर्मानुसार आपल्या श्रद्धास्थानांवर विश्वास ठेवतात आणि आयुष्यात सामोरे जात असतात. आजचा दिवस नियतीच्या कृपेने सुखरूप पार पडला म्हणून मग प्रत्येक माणूस आपल्या श्रद्धास्थानाला धन्यवाद देत असतो. ज्यावेळी असे भीषण अपघात होतात आणि त्यात आपल्या जवळचे लोक मृत्युमुखी पडतात त्यावेळी तो माणूस फक्त नियतीलाच दोष देत असतो. कारण नियतीच सर्व काही ठरवत असते.
तुमच्या आयुष्यातील कोणतीही दुर्घटना किंवा तुमचा मृत्यू हा जर नियतीने निश्चित केला असेल तर तो टळत नाही.
इथे व. पु. काळे यांच्या एका कथेतील एक प्रसंग आठवतो. त्या कथेतील नायकाला कुणीतरी ज्योतिष्याने सांगितले होते की विशिष्ट कालावधीत त्या व्यक्तीने चार चाकी वाहनांपासून जपून रहावे. चारचाकी वाहनांमुळे त्या व्यक्तीला अपघात योग संभवतात. मग अपघाताचा तो पूर्ण आठवडा या कथेचा नायक कुठेही घराबाहेर गेला नाही. घरातच बसून राहिला. त्यामुळे चारचाकी वाहनात बसण्याचा किंवा रस्त्याने जाताना चार चाकी वाहनाचा धक्का लागण्याचा प्रश्नच येत नव्हता.
ठरलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवसापर्यंत हा कथानायक घरातच होता. कितीही महत्त्वाचे काम आले, तरीही तो बाहेर गेला नाही. दुसऱ्या कुणाला तरी पाठवले. अखेरचा दिवसही संपत आला होता. त्यामुळे सद्गृहस्थ खुशीत होते. त्या खुशीत संध्याकाळी ते नातवाशी खेळू लागले, आणि ते खेळताना नातवाच्या खेळण्यातल्या चार चाकी गाडीवर पाय पडून ते घसरले. त्यात ते धाडकन खाली पडले. या प्रकारात त्यांच्या डोक्याला देखील जबर मार बसला आणि कंबरेचे हाड मोडले. परिणामी पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि सहा महिने घरात अंथरुणावर पडून राहावे लागले होते. थोडक्यात काय तर नशिबात अपघात असलाच तर तो कसाही होतोच. आणि जर तुमच्या नशिबात होणारा अपघात टाळणार असेल तर तो टाळतोच. मग कोणीही तो अपघात घडवू शकत नाही. तुम्ही त्यातून सुखरूप बचावताच.
इथे मला माझ्याच आयुष्यात घडलेला एक प्रसंग आठवतो –
ही घटना १९८२ सालची आहे. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शन साठी वृत्त छायाचित्रकार म्हणून कंत्राटी पद्धतीवर विदर्भात काम करत असे. १९८२ च्या नोव्हेंबर महिन्यात वर्धेजवळ नागपूर वर्धा मार्गावरील पवनार येथे असलेल्या परमधाम आश्रमात त्यावेळी सर्वोदय नेते विनोबा भावे राहत होते. एक दिवस बातमी आली की विनोबा भावे गंभीररित्या आजारी आहेत. आम्ही सर्वच माध्यमकर्मी सावध झालो. कारण विनोबा भावे ही मोठी हस्ती होती. त्यामुळे त्यांची कोणतीही बातमी चुकवता येत नव्हती.
दुसऱ्याच दिवशी सकाळी मुंबई दूरदर्शनचे तत्कालीन वृत्त विभागाचे वरिष्ठ निर्माते डॉ. गोविंद गुंठे यांचा मला फोन आला, आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून वर्धेला जाऊन आवश्यकते चित्रीकरण कर, अशा सूचनाही त्यांनी मला दिल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दूरदर्शनच्या केंद्र संचालकांच्या सूचनेनुसार स्वतः डॉ. गुंठे तसेच दूरदर्शनचे मुख्य वृत्तछायाचित्रकार सतीश भाटिया आणि एक साऊंड रेकॉर्डिंग मोहन असे तिघेही विमानाने नागपुरात पोहोचले. मग आमच्या दररोज नागपूर ते पवनार अशा फेऱ्या सुरू झाल्या. दोन दिवस राहून काही विशेष घडत नव्हते. म्हणून मग तिसऱ्या दिवशी डॉक्टर गुंठे आणि त्यांच्या टीमने परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी विनोबाजींनी प्रायोपवेषण सुरू केल्याची बातमी आली. मग या मंडळींनी रात्रीच्या गाडीची काढलेली तिकिटे रद्द केली आणि ते तिघे आणि चौथा मी असे चौघेही माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या गाडीने पवनारला जाऊन थांबायचे असे ठरले.
त्यानुसार नागपूरच्या आमदार निवासात थांबलेली ही मंडळी धरमपेठला माझ्या स्टुडिओत आली. मी देखील तयारीतच होतो. त्यामुळे माझी बॅग आणि इतर सामान देखील गाडीत ठेवले. सोबत जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर महाजन हे देखील होते. जाण्यापूर्वी एकेक कप चहा घेऊया असे म्हणून आम्ही थांबलो. तोवर संध्याकाळचे पावणेसात वाजत होते. त्यावेळी संध्याकाळी आकाशवाणी नागपूरवर मराठी प्रादेशिक बातम्या लागायच्या. आम्ही सर्वजण बातम्या ऐकायला थांबलो. बातम्या ऐकून संपल्या आणि माझे सहकारी सतीश भाटिया यांच्या डोक्यात काय आले कोण जाणे. सतीश अचानक म्हणाले डॉ. गुंठे पवनारला मी एक कॅमेरामन तर आहेच. मग अविनाशला का सोबत घेऊन जायचे ? त्याला इथेच त्याच्या घरच्या मंडळींसोबत सुखाने राहू दे ना. इमर्जन्सी आली तर त्याला बोलावून घेऊ. क्षणभर विचार करून डॉ. गुंठेंनी देखील ही सूचना मान्य केली, आणि लगेचच माझ्या स्टुडिओतील माणसाला आवाज देत अविनाशच्या बॅगा गाडीतून काढून ठेव अशी सूचना डॉ. गुंठे यांनी केली. त्यानुसार माझ्या बॅगा काढल्या गेल्या आणि संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मी वगळता उर्वरित सर्व मंडळी पवनारकडे रवाना झाली.
त्या रात्री मी आता पवनारला जायचा त्रास नाही म्हणून घरी निवांत झोपलो. सकाळी सहा वाजता जागा झालो ते फोनच्या घंटीनेच. फोन उचलला तर फोनवर विभागीय माहिती उपसंचालक प्रभाकर भुसारी होते. त्यांनी मला सांगितले की दूरदर्शनच्या टीमला घेऊन जाणाऱ्या आमच्या जीपचा काल रात्री सेलूजवळ अपघात झाला आहे, आणि आज नऊ वाजता पवनारला विनोबांची प्रकृती बघण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी येत आहेत. त्यामुळे तुला लगेचच तयार होऊन निघायचे आहे. हा फोन ठेवत नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्रीपाद सहस्रभोजने यांचाही फोन आला. मग मी लगेच तयार झालो.
आठ वाजता माझ्याकडे गाडी आली आणि मी वर्ध्याला रवाना झालो. तिथे गेल्यावर कळले की सेलू जवळ ओव्हरटेक करताना ही जीप उलटली त्यात डॉ गुंठे सतीश भाटिया मोहन आणि प्रभाकर महाजन हे किरकोळ जखमी झाले, तर गाडीचा ड्रायव्हर बऱ्यापैकी जखमी झाला आहे. पवनारला गेल्यावर डॉक्टर गुंठे, सतीश आणि मोहन यांना भेटलो. हे सर्वच जखमी अवस्थेत पंतप्रधानांचा दौरा कव्हर करायला उभे झाले होते. मी पोहोचताच त्यांच्या जीवात जीव आला. मला बघताच डॉक्टर गुंठे म्हणाले अविनाश कशी काय तर सतीश ला बुद्धी झाली, आणि तुला आम्ही गाडीतून उतरवले. नाही तर तू देखील आज आमच्यातलाच एक असता. मी त्या क्षणी परमेश्वराचेच मनोमन आभार मानले आणि सतीश भाटियाला आता धावपळ न करता एका जागीच बसून चित्रीकरण कर बाकीचे मी सांभाळतो असे सांगत पुढल्या कामाला लागलो. त्या क्षणी माझ्याही मनात आले की नियतीनेच मला वाचवले होते. माझाही काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती.
शेवटी नियती हीच सर्वश्रेष्ठ असते. आनंद सिनेमात राजेश खन्नाने म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व नियतीच्या हातातील कठपुतळ्या असतो हेच खरे. हेच इथे सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटले.
—————————————————————————————————————-