कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रत्येक कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स पोलिसी खूप महत्वाची असते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. लोकांच्या कुटुंबासाठी जीवन विमा हा एकच आधार बनतो. तुम्हीपण जीवन विमा संरक्षण घेतले असेल तर, तुम्ही तुमच्या कुटुंबाला दाव्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती द्यावी.
या बातमीत, जीवन विम्याचा दावा कसा केला जातो आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जाणून घेऊया. मात्र, विमा कंपन्या घटनेच्या वेळी पॉलिसी सक्रिय होती की नाही याची तपासणी नक्कीच करतील. याशिवाय, जीवन विमा पॉलिसीबद्दल दावा करण्यात विलंब होण्यामागील कारणे देखील तपासली जातील, कारण आणि कागदपत्रे बरोबर आढळली तर तुम्हाला विम्याची रक्कम दिली जाते.
विमा पॉलिसीवर डेथ क्लेम कसा करायचा
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अवलंबितांनी विमा कंपनीला पॉलिसी क्रमांक, विमाधारकाचे नाव, तारीख, ठिकाण आणि मृत्यूचे कारण इत्यादी तपशीलांसह लेखी सूचना द्यावी. यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेतून माहिती फॉर्म मिळवू शकता किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.
विम्याचा दावा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
क्लेम फॉर्म सबमिट करताना मृत्यू प्रमाणपत्र, विमाधारकाच्या वयाचा पुरावा, पॉलिसी कागदपत्रे, असाइनमेंट डीड इत्यादी कागदपत्रे सादर करा. तसेच पॉलिसीधारकाचा जीवन विमा खरेदी केल्यानंतर तीन वर्षांच्या आत मृत्यू झाला तर काही अतिरिक्त कागदपत्रे देखील सादर करावी लागतील. यामध्ये – मृत व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालय प्रमाणपत्र, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून अंत्यसंस्कार किंवा दफन प्रमाणपत्र, मृत व्यक्ती नोकरी करत असल्यास मालकाचे प्रमाणपत्र, आजाराची माहिती देणारे वैद्यकीय सेवकाचे प्रमाणपत्र – यांचा समावेश आहे.
जीवन विमा दावा निकाली काढण्याचा कालावधी
आयआरडीएआय नियमांनुसार, विमा कंपन्यांनी रकमेचा दावा केल्यापासून 30 दिवसांच्या आत विमा रक्कम जारी करणे अनिवार्य आहे. विमा कंपनीला अतिरिक्त चौकशी करायची असेल तर, दावा मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
विमा क्लेम करण्यासाठी वेळ मर्यादा
एखाद्या व्यक्तीने जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनींना दावा दाखल करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. म्हणजे डेथ क्लेम करण्यासाठी नामांकित व्यक्तीला कोणतीही कालमर्यादा नाही. याउलट आरोग्य विम्याच्या बाबतीत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पॉलिसीधारकाला दाव्याची माहिती देण्यासाठी एक कालमर्यादा आहे. कॅशलेस किंवा परतफेड सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विमा दाव्यांसाठी वेगवेगळ्या वेळेच्या मर्यादा असून आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकांनी वेळेचे पालन केले पाहिजे.
कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाला नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या 48 किंवा 72 तास आधी माहिती देणे अनिवार्य आहे. आपत्कालीन परिस्थितीत, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे लागेल तर, रिफंड मिळविण्यासाठी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज समरी मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत जास्तीत जास्त 90 दिवसांसाठी दावा दाखल केला जाऊ शकतो.