मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे. २९ ऑगस्ट रोजी ते लाखो मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले होते. गेल्या चार दिवसांपासून हजारो वाहनांनी आणि आंदोलनकर्त्यांनी मुंबईत गर्दी केल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना विरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे. मूळतः या याचिकेवर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र मुंबईतील बिघडलेल्या परिस्थितीमुळे न्यायालयाने स्वतःची सुट्टी रद्द करून आजच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधीच उच्च न्यायालयाने “अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवता येणार नाहीत ” असा निर्वाळा दिला होता. तसेच आझाद मैदानात फक्त ५ हजार लोकांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटी – मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी काही कठोर अटी घातल्या आहेत
-
आंदोलनास एका वेळी केवळ एक दिवसासाठीच परवानगी दिली जाईल. त्यानंतर पुन्हा दोन दिवस मुदतवाढ मिळाली.
-
ठराविक वाहनांनाच प्रवेश असेल. मुख्य नेत्यासोबत फक्त ५ गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल, बाकी वाहने पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क करावी लागतील.
-
आंदोलनात जास्तीत जास्त ५ हजार लोकांनाच सहभागी होता येईल.
-
आंदोलनादरम्यान मोर्चा काढण्यास परवानगी नाही.
-
ध्वनीक्षेपक वा प्रचार यंत्रणा परवानगी शिवाय वापरता येणार नाहीत.
-
स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
-
गणेशोत्सवामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास वा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन होऊ नये. तसेच लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी करू नये.