मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र आणि पृथ्वी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, ५ जुलै ते ९ जुलै दरम्यान महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. आजपासून तळकोकण व संपूर्ण किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यांचा जोर राहणार आहे. या काळात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
रविवार आणि सोमवार (६ व ७ जुलै) रोजी पुणे घाटमाथा परिसरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढणार
कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. समुद्रात जाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
५ ते ९ जुलै : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर
-
कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात वादळी पाऊस
-
पुणे घाटमाथ्यावर ६ व ७ जुलैला रेड अलर्ट
-
समुद्रात वाऱ्याचा वेग : ४५ ते ५५ किमी प्रतितास
-
नागरिकांनी आवश्यक सुरक्षेची खबरदारी घ्यावी
————————————————————————————–