कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांचे पाणी पात्राबाहेर जात असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसानंतरही धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, १३ नद्यांवरील तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सध्या वारणा नदीवरील सर्वाधिक ९ बंधारे पाण्याखाली असून, कासारी नदीवरील ८, पंचगंगा आणि घटप्रभा नदीवरील प्रत्येकी ७, भोगावतीवरील ६, वेदगंगेवरील ५, ताम्रपर्णीवरील ४, धामणीवरील ३, तर कुंभी आणि कडवी नदीवरील प्रत्येकी २ बंधारे जलमय झाले आहेत. याशिवाय, दूधगंगा, हिरण्यकेशी आणि तुळशी नदीवरील प्रत्येकी एक बंधारा पाण्याखाली गेला आहे.
या पुरामुळे १९ प्रमुख मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली असून, ९ मार्गांवरील एसटी बससेवाही बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद झाल्याने १०० हून अधिक गावांचा एकमेकांशी थेट संपर्क तुटला आहे. या गावातील नागरिकांना पर्यायी मार्गाने दूरवरून प्रवास करावा लागत असून त्याचा वेळ व आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसत आहे.

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांमधून विसर्ग सुरूच असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ सुरूच आहे. परिणामी, चार राज्य मार्गांवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात धरणांचे विसर्ग वाढले; पूरजन्य परिस्थितीचा धोका
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे कृष्णा, वारणा, नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या रेषेवर तर राधानगरीच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. कोयना आणि चांदोली धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई आणि जावळी तालुक्यांत जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरणात पाणीसाठा वेगाने वाढत असून, विसर्ग अधिक वाढल्यास नद्यांच्या आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
पुणे जिल्ह्यात खडकवासला विसर्ग वाढल्याने जलमय परिस्थिती
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरले आहे. महापालिकेकडून तातडीने मातीचा बांध घालून पूर नियंत्रणाचे उपाय सुरू आहेत. उजनी आणि वीर धरणांतील एकूण विसर्ग एक लाख क्यूसेकपेक्षा अधिक असल्याने भीमा नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसामुळे काही ठिकाणी अडचणी असल्या तरी शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरत आहे. खरीप हंगामाला वेग मिळण्याची चिन्हं असून, शेतकरीही आनंदीत आहेत. मात्र, नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने पूरस्थितीची भीती कायम आहे.
—————————————————————————————-