पुणे प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
येत्या काही दिवसांत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी वारी पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर दिवे घाटातील अपूर्ण कामे, पावसामुळे निर्माण झालेली स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेले धोके यामुळे पालखी मार्गावर मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा साचलेला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याचाही धोका वाढला आहे. यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी कंत्राटदारांना थेट इशारा देत जर हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर संबंधित कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “वारी ही आपली श्रद्धेची परंपरा आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेशी कुठलाही तडजोड खपवून घेतला जाणार नाही. कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.”
तसेच त्यांनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा निर्देश दिले की, आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत. तसेच दरडी कोसळू शकतील अशा ठिकाणी संरक्षणासाठी मजबूत जाळ्या आणि इतर उपाय तत्काळ उभारावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
पालखी प्रस्थान फक्त काही दिवसांवर येऊन ठेपले असताना अजूनही कामे अपूर्ण राहणे हे प्रशासनासाठीही चिंतेचे कारण बनले आहे. वारकरी संप्रदाय आणि नागरिकांनीही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
वारीचा मार्ग सुकर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणांना आता वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा, वर्षानुवर्षे जपलेली ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अडथळ्यांत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
——————————————————————————————-