कुरुंदवाड : अनिल जासुद.
शिरोळ- घालवाड दरम्यानच्या रस्त्यालगत काही शेतकरी व्यावसायिकांच्या शिवारात वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्टीसाठी आणलेल्या मातीच्या ढिगार्यावरच संबधित शेतकर्यांनी भुईमुग, उडीद, शाळू, मका, वरणा, भेंडी ही पिक घेतले आहे. मातीच्या ढिगार्यावरील ही पिके सध्या पावसाच्या पाण्यामुळे चांगलीच बहरली आहेत. ही पिकं रस्त्यावरुन येणार्या जाणार्या प्रवाशीवर्ग, ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहेत.
घालवाड येथील अजित खोत, सुशांत जाधव, सुनिल कुंभार या शेतकरी व्यावसायिकांच्या शिरोळ – घालवाड रस्त्यालगत आपल्या शिवारात वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीटा तयार करण्यासाठी नदीकाठावरील लाल मातीची आवश्यकता असते. ही लाल माती मृदु, मुलायम असल्याने याचा चिखल लवकर होतो. ही लाल माती उन्हाळ्यातच ओढून ढीग मारुन ठेवण्यात आली आहे.
सध्या पावसाळा असल्यामुळे वीटभट्टीचे काम चार महिने बंद असते. वीटभट्टीसाठी आणलेल्या लाल मातीच्या ढिगार्यावर तन उगवत असते. या तनाचा काहीही उपयोग नसतो. यावर शेतकऱ्यानी नामी शक्कल लढविली आहे. या ढिगार्यावरच पावसाळ्यात संबधित शेतकर्यांनी भुईमुग,उडीद,वरणा,भेंडी,शाळू, मका अशी पिके घेतली आहेत. लाल माती जशी मृदु, मुलायम असते तशी ती सुपिकही असते. यामुळे या मातीत पिके चांगली बहरतात. मातीच्या ढिगार्यावरील पिकांना ना रासायनिक खतांची मात्रा आहे, ना पाणी देण्याची आवश्यकता. मातीच्या ढिगार्यावरील ही पिके पावसाच्या पाण्यावरच अतिशय उत्तमरित्या बहरली आहेत.मातीच्या ढिगार्यावरील या पिकांना रासायनिक खत दिले, ना पाणी दिले. गेल्या दोन महिन्यात झालेल्या पुरेशा पावसाच्या पाण्यावरच ही पिके बहरली आहेत. यातून दिवाळीपर्यंत घरापुरते खायला भुईमुग, उडीद, भेंडी मिळते, तर जनावरांना शाळू, मक्याची वैरण मिळते. आता यामध्ये यावर्षी सुर्यफुलाचेही उत्पादन घेणार आहे. :दिपक साळुंखे. सुशांत जाधव. वीटभट्टी व्यावसायिक शेतकरी.घालवाड. ता.शिरोळ.