ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

मंत्रालय पातळीवर काँग्रेसचा पाठिंबा : आमदार सतेज पाटील

0
120
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता एल्गार पुकारला असून आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास १८ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. तर या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्याबाबत, आपणं पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे त्याच बरोबर राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३ हजार ४१० रूपये राहणीमान भत्ता लागू करून मागील फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांकरिता कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आज शुक्रवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राज्यभरात सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही कळवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण विकासाचा कणा असून त्यांचे पगार थकवणे चुकीचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जे शासन निर्णय घेण्यात आलेत, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आणि मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील आमदार सतेज पाटील यांनी दिली.
यावेळी केलेल्या मागण्या –
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित.
  • गेली चार महिने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार मिळालेला नाही.
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत मार्फत वार्षिक विमा काढण्यात यावा.
  • दहा टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करावी 
  • रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. भविष्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सोबत रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असेही देवणे यांनी सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बबन पाटील, रवी कांबळे अशोक पाटील,.परशराम जाधव, अशोक गेंगे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी मोठ्या संख्येन आंदोलनात सहभागी होते.
——————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here