Medical Education Minister Hasan Mushrif distributing approval letters and cheques to the beneficiaries of government schemes at the Shri Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp organized in Kagal. District Collector Amol Yedge and officials were present on this occasion.
कागल : प्रसारमाध्यम न्यूज
शासनाच्या पगारावर माझी रोजी रोटी चालते, माझा संसार चालतो, माझ्या मुलाबाळांचे शिक्षण चालते. हा पगार देण्यासाठी जनतेतूनच पैसा गोळा होतो. याची जाण ठेवून शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता जर गोरगरिबाचं काम केलं तर मला वाटते या राज्यामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. योग्यवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती शासन करणार आहे. तसेच; लाडकी बहीण योजनेचे अनुदान २१०० रुपये करणार आहोत, असेही ते म्हणाले.
तहसीलदार कार्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षस्थानी होते.
कागल : तहसीलदार कार्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते
मंत्री हसन मुश्रीफ – शासकीय जी कामे आहेत, तसेच शासनाने वेळोवेळी काढलेल्या योजनांचा लाभ विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांकडून सुलभरीत्या मिळावा. यासाठी ही योजना महायुती सरकारने आणली आहे. यातून जनतेचे समाधान व्हावे, गोरगरिबांची परवड होता कामा नये, ही अपेक्षा शासनाची आहे.
शासनाने पावसामुळे गोरगरिबांना तीन महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य गोरगरिबांना मिळाले पाहिजे . पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे खरोखर जे गरीब आहेत त्यांना हे सवलतीचे धान्य कसे मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे – या अभियानातून कागल तालुका प्रशासनाने १० हजार लाभार्थ्यांसाठी लाभ मिळवून दिला आहे. जिल्ह्यात 80 पेक्षा अधिक मंडळे आहेत . चार ठिकाणी वर्षभरात मोठी चार समाधान शिबिरे राबवणार आहोत . सातबारा परिपूर्ण असावा, यासाठी काम सुरू आहे. राज्यात फेरफार घेण्यामध्ये सर्वात कमी दिवस आपले आहेत. सातबाराची नोंद ऑनलाइन होऊ शकते. मोजणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी या अभियानातून 31 मे पर्यंतची प्रकरणे 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असेल. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय .
कार्यक्रमास गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. अजय पाटणकर, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.
…………………………………………………………………………………………………….