पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरी वारकऱ्यांच्या भक्तीने दुमदुमून गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच सपत्नीक पंढरपूरमध्ये दाखल झाले. आज पहाटे त्यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा यांच्या उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे २० लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. टाळ, मृदंग, अभंग आणि “विठ्ठल-विठ्ठल” च्या जयघोषाने पंढरपूर शहर भक्तीरसात चिंब झाले आहे. आषाढ धारा कोसळत असतानाही भाविकांची पावले थांबली नाहीत. विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होते.
यावर्षी मानाच्या वारकऱ्यांचा मान नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले या दांपत्याला मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून हे दांपत्य निष्ठेने वारीत सहभागी होत आहे. त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शाल व विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
पंढरपूर कॉरिडोर संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी शासन कटिबद्ध आहे. २०१८ पासून ‘निर्मल वारी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालखी मुक्काम ठिकाणी स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते.”
“पंढरपूर कॉरिडोर हा भाविकांच्या सोयीसाठी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही घाई न करता सर्व संबंधित पक्ष, वारकरी संप्रदाय आणि नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील,” असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
वारकऱ्यांच्या भक्तीने पंढरपूर नगरी गजबजली असून, संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमले आहे. प्रशासनाकडून सुरक्षेपासून ते आरोग्य, पाणी आणि आवश्यक सेवा-सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
———————————————————————————————–