Huge deposits of gold have been discovered in the state of Odisha on the eastern coast of India.
भुवनेश्वर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या पूर्व किनार पट्टीवरील ओडिशा राज्यात सोन्याचे प्रचंड साठे आढळून आले असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही मोठी घडामोड मानली जात आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था (GSI) आणि राज्य सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
देवगड ( आदासा-रामपल्ली ), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध या भागात अजूनही सोन्याचा शोध सुरू आहे. मार्च -२०२५ मध्ये खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत ही माहिती सादर केली होती.
किती सोनं मिळणार ?
सोन्याच्या खाणींमधून नेमके किती सोनं मिळणार याबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भूगर्भीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या भागात १० ते २० मेट्रिक टन सोने असू शकते. हा आकडा भारताच्या प्रचंड सोन्याच्या मागणीच्या तुलनेत मर्यादित असला तरी, देशातील सोन्याचे स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
गेल्या वर्षी भारताने जवळपास ७००-८०० मेट्रिक टन सोने आयात केले होते, तर २०२० पर्यंत देशातील वार्षिक उत्पादन केवळ १.६ टनांपुरते मर्यादित होते. त्यामुळे ओडिशातील खाणींमुळे भारत पूर्णपणे आयातीवरून मुक्त होणार नसला, तरी स्थानिक उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे.
खाणकामाची तयारी
ओडिशा सरकार, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि GSI या साठ्यांचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाणीचा ब्लॉक लिलावासाठी काढण्याची तयारी सुरू असून, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या महसूलात वाढ होणार आहे.
प्रादेशिक विकासाला गती
या शोधामुळे ओडिशामध्ये प्रादेशिक विकासाला गती मिळणार आहे. खाणकाम, वाहतूक, पायाभूत सुविधा, स्थानिक सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, तसेच ओडिशातील खनिज निर्यातीला नवी चालना मिळेल.
सध्या ओडिशात भारतातील क्रोमाईटचे ९६ टक्के, बॉक्साईटचे ५२ टक्के आणि लोह खनिजाचे ३३ टक्के साठे आहेत. आता सोन्याचे साठेही उपलब्ध झाल्यामुळे ओडिशा देशातील खनिज संपत्तीचा महाकेंद्र म्हणून अधिक समृद्ध बनले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा शोध भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देईल आणि जागतिक सोन्याच्या बाजारपेठेत देशाची स्पर्धात्मक ताकद वाढवेल.