मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गणेशोत्सव हा आता अधिकृतपणे “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून साजरा केला जाणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार हेमंत रासणे यांच्या मागणीवर उत्तर देताना मंत्री शेलार यांनी ही घोषणा केली.
हेमंत रासणे यांची मागणी
सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार हेमंत रासणे यांनी विधानसभेत गणेशोत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करत, गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले की, “गणेश मंडळे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. मात्र अलीकडे त्यांच्यावर विविध बंधने आल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. म्हणून हा उत्सव शासनाने सन्मानाने राज्य महोत्सव म्हणून घोषित करावा.” अशी मागणी केली.
आशिष शेलारांचे उत्तर : ऐतिहासिक घोषणा
मंत्री आशिष शेलार – गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केली. त्याआधी हा उत्सव घरोघरी साजरा होत असे. हा उत्सव महाराष्ट्राचा गौरव आहे आणि म्हणूनच राज्य सरकार लवकरच गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करणार आहे. ही मी आजच अधिकृत स्पष्टता देतो.” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “देशात आणि जगात गणेशोत्सवाचा प्रचार, प्रसार आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे. हा उत्सव केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक ओळख बनली आहे.”
विसर्जनाबाबत परंपरेचा सन्मान
शेलारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांची न्यायालयात मांडलेली भूमिका देखील अधोरेखित केली.“POP मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. गणेश विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोणत्याही प्रकारे गणेशोत्सवाच्या उत्सवात सरकार अडथळा ठरणार नाही.”
आपल्या भाषणात शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “गेल्या सरकारने शंभर वर्षांची परंपरा खंडित केली. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसू शकला नाही. काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले, पण आमच्या सरकारने ते दूर केले आहेत.”
या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. आता शासनाच्या पाठबळाने गणेशोत्सव अधिक भव्य, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करता येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागताला यंदा ‘राज्य महोत्सव’चा दर्जा लाभणार असल्याने, हे पर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक नवा इतिहास रचणार आहे.
———————————————————————————————–