मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलनं, निवेदने आणि मागण्यांची साखळी सुरू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत उपस्थित केला. उत्तरादरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात सविस्तर बैठक घेण्याचं आश्वासन सभागृहात दिलं होतं. त्यानुसार आज मंत्रालयात ही बैठक पार पडली.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यात आल्या आणि वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथील सैनिक स्कूल परिसर हा जंगलालगत असल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ तारेचं कुंपण उभारण्याचे निर्देश यावेळी अधिकार्यांना देण्यात आले. तसेच त्या ठिकाणी मंजूर असलेल्या निसर्ग पर्यटन केंद्र देखील लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री यांनी दिले.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव या भागांत हरिण, डुक्कर यांसारख्या वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान केलं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
या भागांतील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून सतत आंदोलन करत आहेत. या मागण्यांची दखल घेत अधिवेशनामध्ये वनमंत्र्यांकडे थेट शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेण्याची विनंती केली गेली. शासनानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत, अधिवेशन सुरू असतानाही मंत्रालयात तात्काळ बैठक आयोजित केली. या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेतांभोवती तारेचे कुंपण उभारण्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्याची घोषणा केली.
या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, आमदार सदाभाऊ खोत, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, लातूर व कोल्हापूर जिल्ह्यांचे वन अधिकारी, रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय चिखलकर आणि अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
————————————————————————————–



