कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमधील पहेलगाममध्ये २२ एप्रिलला पर्यटकांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून दहशतवाद्याना धडा शिकवण्यासाठी भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे पाकिस्तानवर मर्यादित स्वरूपाची कारवाई केली. यानंतर पाक थांबण्याऐवजी परत ८ मे रोजी पाकने ड्रोन व विमानाद्वारे भारतावर हल्ला चढवला. मात्र भारताने हा हाल्ला परतावून लावला. यानंतर मात्र काही तासातच भारताने पाकमधील शहरावर हल्ले चढविले.
या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आजपर्यंत झालेल्या चार प्रमुख युद्धाचा संक्षिप्त आढावा :
पहिले युद्ध – १९४७-४८
भारताच्या फाळणीनंतर काश्मीरच्या संस्थानिकांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. याला विरोध करत पाकपुरस्कृत कबायली हल्लेखोर काश्मीरमध्ये घुसले. यामुळे युद्ध झाले. हे युद्ध संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाने थांबवण्यात आले. काश्मीरचे दोन भाग झाले – एक भारताकडे (जम्मू आणि काश्मीर) व दुसरा पाकिस्तानकडे (आजचा पाकिस्तान अधिकृत काश्मीर). जानेवारी 1949 मध्ये युद्धविराम झाला.
दुसरे युद्ध – १९६५
पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर सुरू करून काश्मीरमध्ये घुसखोरी केली. याला भारताने प्रत्युत्तर दिले. परिणामी जोरदार युद्ध झाले. यानंतर सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने ताशकंद करार झाला. हे युद्ध सप्टेंबर 1965 मध्ये थांबले.
तिसरे युद्ध – १९७१
बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) मध्ये झालेला गृहयुद्ध, निर्वासितांचे भारतात आगमन व मानवी हक्कांचे उल्लंघन या प्रमुख कारणामुळे हे युद्ध झाले. यावेळी भारताने बांगलादेशच्या मुक्तीसाठी हस्तक्षेप केला. युद्धाला तोंड फुटले. पाकिस्तानचा पराभव झाला, आणि बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. यावेळी 90 हजारपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली.
कारगिल युद्ध – १९९९
पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांनी कारगिलच्या उंच भागांवर कब्जा केला. भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय अंतर्गत त्या ठिकाणी पुन्हा ताबा मिळवला. हे युद्ध जरी सीमित असले तरी अतिशय उग्र होते. भारताने जागतिक स्तरावर पाकिस्तानचा हेतू उघड केला.
—————————————————————————————–



