कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला विरोधकांकडून विरोध होत असतानाच, आज या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले. या शेतकऱ्यांनी स्वतःचे सातबारा उतारे हातात घेत प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर सरकारने पाचपट मोबदला दिला, तर ते आपल्या जमिनी महामार्गासाठी देण्यास तयार आहेत. या शेतकऱ्यांनी प्रकल्पाला “विकासाची गती” असे संबोधून त्यास विरोध करण्याऐवजी योग्य मोबदल्यासोबत सहकार्याची भूमिका घेतली.
विरोधकांकडून सतत करण्यात येणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर देताना, आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “विरोधक शक्तिपीठ महामार्गाचे राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आज ८० टक्के शेतकरी स्वतःहून सातबारा घेऊन इथे आले आहेत, हेच पुरेसं सांगतं की, बहुसंख्य शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोणी या प्रकल्पाच्या आडवे आलं, तर मी स्वतः आडवा उभा राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ दिशाभूल आहे.”
विशेषतः ज्या शिरोळ तालुक्यात महामार्गाला सर्वाधिक विरोध असल्याचे सांगितले जाते, तिथूनच आज बहुसंख्य शेतकरी पाठिंब्याने उतरले, ही बाब लक्षवेधी ठरली. “जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं,” असा सल्लाही आमदार क्षीरसागर यांनी दिला.
हा मोर्चा आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहता, शक्तिपीठ महामार्गाबाबतचा जनतेतील कल बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात सरकारकडून मोबदल्याच्या दराबाबत स्पष्टता आल्यास, या प्रकल्पास गती मिळण्याची शक्यता बळावली आहे.
——————————————————————————————